Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरकरांकडून विश्वविजेत्या गंगाचे जंगी स्वागत

 सोलापूरकरांकडून विश्वविजेत्या गंगाचे जंगी स्वागत






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विमानतळावर पोलिस बॅंडची धून... फुलांचा वर्षाव.. देशभक्तिपर गीतांनी भारलेले वातावरण... दमाणी अंध शाळेच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम अन् ढोल पथकाचा निनाद...उघड्या कारमधून विश्वविजेत्या भारतीय संघाची उपकर्णधार व सोलापूरची लाडकी लेक गंगा कदम हिची मिरवणुकीने प्रत्येक सोलापूरकरांची मान उंचावली.

जागतिक अंधाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या संघाने विश्वकरंडक स्पर्धा जिंकली. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व उपकर्णधार नात्याने गंगा कदम हिने केले. विश्वचषक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच तिचे सोलापुरात आगमन झाले. मुंबई येथून विमानाने गंगाचे आगमन झाले. होटगी रोड विमानतळावर दमाणीनगर अंध शाळेच्या वतीने तीचे जंगी स्वागत करण्यात आले. पोलिस बॅंड पथकाने देशभक्तिपर गिते सादर करत वातावरणात उत्साह भरला.

तेथून उघड्या वाहनावर गंगाची मिरवणूक निघाली. त्यासोबत दमाणी अंध विद्यामंदिरच्या वाहनात विद्यार्थी एकत्र आलेले होते. मिरवणूक आसरा, सातरस्ता, मोदीखाना मार्गे दमाणी विद्यामंदिर परिसरात पोचली. त्याठिकाणी आतषबाजी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने ढोलच्या तालावर मिरवणूक काढली. दमाणी अंध विद्यामंदिरच्या प्रांगणात रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी शिक्षिकांनी औक्षण करून गंगाचे स्वागत केले. त्यानंतर दमाणी अंध विद्या मंदिरचे अध्यक्ष संतोष सपकाळ, सचिव संतोष भंडारी, जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन शहा, नाट्य कलावंत किरण फडके, मुख्याध्यापक प्रकाश दर्शनाळे व शिक्षक उपस्थित होते.

गंगा कदम म्हणाली, मी लहानपणापासून दमाणी अंध विद्यामंदिरमध्ये शिकले. सरांना मला क्रिकेट खेळू द्या, असे म्हणायचे. शिक्षकांनी संधी दिली. अकरावीला पहिल्यांदा नाशिकला क्रिकेट मॅच खेळल्यानंतर माझ्या शिक्षकांनी मला प्रगतीचे प्रोत्साहन दिले. विश्वचषक स्पर्धेत समोर अनुभवी नेपाळचा संघ होता. पण आमच्या कोचने सांगितले की, त्यांचे व आपले सारखेच खेळाडू असतील जिंकण्याची संधी आपल्याला देखील आहे. त्यांच्या प्रेरणाने उत्साह भरला. आमच्या संघात सर्व अष्टपैलू खेळाडू होते. एकदिलाने लढलो व जिंकलो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हा निमंत्रित केले. त्यांनी आमची आवडनिवड आस्थेने विचारली. एका बॅटवर आमच्या स्वाक्षऱ्या देखील घेतली. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने मी प्रभावीत झाले. आता पुढे मला क्रिकेटमध्ये करिअर करायचे आहे.

गावी जाण्याची ओढ

गंगा कदम हिचे मूळ गाव फुटाणा (ता.कळमनुरी, जि. हिंगोली) आहे. विश्वचषकाच्या विजयानंतर आता तीला गावी जाण्याचे वेध लागले आहेत. लवकरच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कुटुंबीयांना भेटणार असल्याचे सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments