Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरमध्ये शैक्षणिक सहलींसाठी 'लालपरी' बस सेवा लोकप्रिय

 सोलापूरमध्ये शैक्षणिक सहलींसाठी 'लालपरी' बस सेवा लोकप्रिय 



       


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांच्या शैक्षणिक सहलींना राज्य परिवहन महामंडळाच्या 'लालपरी' मोठी पसंती मिळत आहे.    सुरक्षित प्रवास, विश्वासार्ह सेवा तसेच तिकीट दरात दिली जाणारी ५० टक्के सवलत यामुळे खासगी बसपेक्षा एसटीला अधिक मागणी वाढली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत ९० ते ९५ एसटी बस बुक झाल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, नोव्हेंबर ते जानेवारी हा काळ शाळा-महाविद्यालयांच्या सहलींचा हंगाम मानला जातो. या हंगामाची सुरुवात होताच सोलापूर विभागातील नऊ आगारांमधून सहलींसाठी विशेष एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. काही महिन्यांपूर्वी विभागात आलेल्या नव्या बसेससह उत्तम स्थितीत असलेल्या लालपरी या शैक्षणिक सहलींसाठी धावत असून, विद्यार्थ्यांचा प्रवास आनंददायी व सुरक्षित व्हावा यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

महामंडळाकडून शैक्षणिक सहलींसाठी देण्यात येणाऱ्या सवलतींचा शाळा-महाविद्यालयांना मोठा लाभ होत आहे. कमी खर्चात अधिक सुरक्षित व विश्वसनीय प्रवास मिळत असल्याने शैक्षणिक सहलींसाठी एसटीची मागणी वर्षानुवर्षे वाढताना दिसत आहे. या माध्यमातून विभागाचा महसूलही वाढण्यास मदत होणार आहे. जानेवारी महिन्यातही सहलींची मालिका सुरू राहणार असल्याने एसटी बस बुकिंगची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
Reactions

Post a Comment

0 Comments