अस्थिरोगांवरील प्रगत रशियन इलिझारोव्ह तंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय फेलोशिप संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आडके हॉस्पिटल रशियन इलिझारोव्ह सेंटर ,आडके फाउंडेशन सोलापूर व आसामी इंडियन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्थिरोगावरील रशियन इलिझारोव्ह तंत्रज्ञानाच्या एक आठवड्याच्या फेलोशिपचे उद्घाटन सोमवार दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आडके हॉस्पिटल व आडके फाउंडेशनचे डॉ.संजीव आडके, डॉ. संतोष आडके, डॉ. जयंती आडके , डॉ. डायना आडके व डॉ.अपूर्वा आडके यांची प्रमुख उपस्थिती होती. आभार प्रदर्शन डॉ. डायना आडके यांनी केले.
आडके हॉस्पिटलचे अस्थिरोग व रशियन इलिझारोव्ह तज्ञ डॉ. संदीप आडके यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आलेले होते. या फेलोशिप प्रशिक्षणासाठी भारतातील सर्व राज्यातून व आफ्रिका खंडातील सुदान ,चाड व नेपाळ इत्यादी ठिकाणाहून ५० अस्थिरोग तज्ञांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावलेली होती.
इलीझारोव्ह हे अस्थिरोगावरील अतिशय प्रगत रशियन तंत्रज्ञान असून यामध्ये शरीराच्या बाहेरूनच वायर्स व रिंगांच्या फ्रेमने सर्व अस्थिरोगांवर अत्यंत प्रभावीपणे उपचार केले जातात. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच त्याच दिवशी रुग्ण आपला शस्त्रक्रिया केलेला हात अथवा पाय वापरू शकतो.अस्थिरोगांवरील सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स ,न जुळलेली हाडे, हाडांना लागलेली कीड, लहान मुलांचे अस्थिरोग,गुडघेदुखी, शरीराची उंची वाढवणे, वेडेवाकडेपणा घालवणे, पोलिओ, पूर्वीच्या अयशस्वी शस्त्रक्रिया तसेच प्राण्यांवर व पक्षांवर सुद्धा कमी खर्चामध्ये ,विना चिरफाड व खात्रीपूर्वक उपचार करणे या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. इलिझारोव्ह तंत्रज्ञानाचे संपूर्ण प्रशिक्षण डॉ. संदीप आडके यांनी १९९९ साली रशियन इलिझारोव्ह सायंटिफिक सेंटर, कुरगान, रशिया या ठिकाणी जाऊन घेतलेले आहे व असे प्रशिक्षण घेणारे ते जगातील पहिले अस्थिरोग तज्ञ आहेत. या अत्यंत उपयुक्त व प्रभावी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी २०१४ सालापासून आडके हॉस्पिटल तर्फे जगभरातील अस्थिरोगतज्ञांसाठी सोलापूरमध्ये या फेलोशिपचे आयोजन करण्यात येत आहे.
अशा कार्यक्रमामुळे वैद्यकीय क्षेत्रात सोलापूरची चांगली प्रसिद्धी झालेली आहे तसेच बाहेर देशातून येणारे अस्थिरोग तज्ञ सोलापुरातून टॉवेल ,चादर तसेच इतर प्रसिद्ध गोष्टींची खरेदी करून जात असल्यामुळे गेल्या ११ वर्षांमध्ये सोलापूरचे आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले ब्रॅण्डिंग होत आहे. तसेच या कार्यक्रमामुळे सोलापूरातील हॉटेल व इतर उद्योगांना त्याचा फायदा होत आहे. यावर्षी सुरू झालेल्या विमानसेवेमुळे डॉक्टरांना सोलापूरमध्ये येणे सुकर झालेले आहे व येथून पुढे संपूर्ण भारतातून व भारता बाहेरून रुग्ण येथे उपचारासाठी येऊ लागतील व मेडिकल टुरिझम सुद्धा वाढेल व त्याचा फायदा हॉटेल टुरिझम अशा इतर व्यवसायांना सुद्धा होईल असे आयोजक डॉ. संदीप आडके यांनी सांगितले.

0 Comments