सनय छत्रपती शासन पक्ष सर्व महापालिका स्वबळावर लढवणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, December 18, 2025

सनय छत्रपती शासन पक्ष सर्व महापालिका स्वबळावर लढवणार

 सनय छत्रपती शासन पक्ष सर्व महापालिका स्वबळावर लढवणार

‘शहर करू सिंगापूर’ अजेंड्यावर निवडणूक – प्रा. नामदेवराव जाधव

पुणे (कटूसत्य वृत्त):-आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये सनय छत्रपती शासन पक्ष राज्यातील सर्व २९ महानगरपालिका स्वबळावर लढवणार असल्याची मोठी घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘शहर करू सिंगापूर’ हा पक्षाचा मुख्य अजेंडा असून, पुणे महानगरपालिकेच्या सर्व १६५ जागांवर उमेदवार दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. नामदेवराव जाधव म्हणाले की, “सध्याचे राजकारण घाणेरड्या पद्धतीने सुरू आहे. जनतेच्या हितापेक्षा सत्ताधाऱ्यांचे वैयक्तिक हित महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्या आहेत. सनय छत्रपती शासन पक्ष या राजकारणाला पर्याय देणार असून, सुशिक्षित, प्रामाणिक आणि करदाता नागरिकांना उमेदवारीत प्राधान्य दिले जाईल.”

ते पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व महापालिकांसाठी लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल. नव्या चेहऱ्यांना संधी देत शहराच्या विकासाचा दीर्घकालीन विचार करणारे प्रतिनिधी जनतेसमोर मांडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनत चालल्याचे प्रा. जाधव यांनी अधोरेखित केले. पुणे जिल्ह्याचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) तब्बल ३१६ इतका धोकादायक पातळीवर पोहोचला असून, सिंगापूरमध्ये तो केवळ १२ ते १५ दरम्यान असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान सुमारे २० वर्षांनी घटत असल्याची धक्कादायक बाब त्यांनी मांडली.

शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील बांधकामांमुळे धूळ व प्रदूषण वाढत असून, त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याची टीकाही त्यांनी केली. “सिंगापूरमध्ये बांधकामस्थळी प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत काटेकोर नियम राबवले जातात. मात्र पुण्यात अशा उपाययोजना केवळ कागदावरच आहेत,” असे त्यांनी सांगितले.

आजही शहराचा विकास पाणी, गटार आणि रस्ते याच मूलभूत प्रश्नांपुरताच मर्यादित राहिला असून, शहराच्या सर्वांगीण प्रगतीकडे दुर्लक्ष झाले आहे. वारंवार तेच चेहरे निवडून दिल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, अपेक्षित विकास न झाल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

सनय छत्रपती शासन पक्षाचे निवडून येणारे लोकप्रतिनिधी शहराचा नियोजनबद्ध, पारदर्शक आणि आधुनिक विकास करतील, अशी ग्वाही प्रा. जाधव यांनी दिली. या पत्रकार परिषदेत राहुल मते यांची सनय छत्रपती शासन पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

या घोषणेमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये नव्या पक्षाची भूमिका काय राहते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages