नेताजी शिक्षण संस्थेत तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेचे थाटात उदघाटन
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त निलम नगर येथील नेताजी शिक्षण संस्थेत तपोरत्नं बौद्धिक व्याख्यानमालेचे थाटात उदघाटन करण्यात आले. संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली,वक्ते इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी संस्था खजिनदार ललिता कुंभार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष धुमशेट्टी, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी मान्यवर उपस्थित होते.
वक्ते इंद्रजित देशमुख (कराड) हे 'सुजाण पालकत्व' या विषयावर पहिले पुष्प गुंफताना आजच्या बदलत्या सामाजिक, शैक्षणिक व तांत्रिक युगात पालकांची भूमिका अत्यंत समर्पक शब्दांत उलगडून सांगितली. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेम, शिस्त, संवाद व संस्कार यांचा समतोल किती आवश्यक आहे, यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला.
देशमुख पुढे म्हणाले,पालकांनी केवळ अपेक्षांचे ओझे न टाकता मुलांच्या क्षमता, आवडी-निवडी समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, तसेच आदर्श आचरणातून संस्कार घडवावेत, हा मौलिक विचार मांडले. जीवनात आध्यात्मिक विकास महत्वाचे असल्याचे सांगितले. जो पर्यंत मनाची एकाग्रता होत नाही तो पर्यंत आयुष्यात यश संपादन करू शकत नाही .आजच्या पिढीला संस्कार घडविण्याचे कार्य होणे गरजेचे आहे.पालकांनी पाल्यांना वेळोवेळी जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करावे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे. चांगल्या संस्कारासोबत संवाद व योग्य मार्गदर्शन होणे काळाची गरज आहे.जेणे करुन विद्यार्थ्यांना परिस्थितीवर मात करता आले पाहिजे.पाल्य पालकांचे अनुकरण करतात म्हणून पालकांनी स्वतःच्या कृती ही आदर्शवत ठेवावेत. पाल्याला ओळखून त्यांच्या गरजा समजून त्यांना स्वातंत्र्य व जबाबदारीची जाणीव करून द्यावी.जीवन असं जगावं लोक आयुष्यभर लक्षात ठेवावे. धैर्य, कर्तृत्व आणि जिद्दीचे प्रतीक म्हणून कल्पना चावला आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले.यावेळी बहुसंख्य श्रोते उपस्थित होते.

0 Comments