शरद कोळीविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन : शेती बळकावल्याचा गंभीर आरोप
सोलापूर (कटूसत्य वृत्त) - अर्धनारी (ता. मोहोळ) येथील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांच्यावर शेती बळकावण्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटवर आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सकाळपासून नागनाथ मदने, हरी मदने, संगीता शिवाजी मदने, सुसाबाई हरिबा मदने आणि चेतन शिवाजी मदने या कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, “अर्धनारी येथे आमची वडिलोपार्जित शेती असून गेल्या तीन महिन्यांपासून शरद कोळी आमची शेती बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्ही घरी नसताना शरद कोळी यांनी आमच्या शेतातील कांदा, मिरची आणि मका पिकांवर नांगर फिरवून नुकसान केले. बोअरवेल तोडली तसेच एका शेळीचा वध केला. ‘शेती मी विकत घेतली आहे, तुमची घरे काढून टाका, नाहीतर जाळून टाकीन,’ अशी धमकीही त्यांनी दिली,” असा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांनी पुढे सांगितले की, त्यांनी या संदर्भात कामती पोलिस स्टेशनला तक्रार दिली असता, पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. “आमच्या शेतीचे नुकसान भरपाई शरद कोळींकडून वसूल करण्यात यावी आणि शेती बळकावण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच शरद कोळी यांना दिलेले पोलिस संरक्षण तातडीने काढून घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या घटनेमुळे अर्धनारी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा या प्रकरणाकडे लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments