Hot Posts

6/recent/ticker-posts

न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचे अपील फेटाळले; अनगर नगराध्यक्ष पदाची निवड अखेर बिनविरोध

 न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचे अपील फेटाळले; 

अनगर नगराध्यक्ष पदाची निवड अखेर बिनविरोध

सोलापूर (कटूसत्य वृत्त) : अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवल्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात दिलेले अपील आज फेटाळण्यात आले. जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य ठरवत थिटे यांचा अपील अर्ज डिसमिस केला. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून अनिश्चिततेत अडकलेली प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड आता अधिकृतपणे सिद्ध झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, कार्यकर्ते व उज्ज्वला थिटे, जयवंत थिटे बुधवारी दिवसभर न्यायालयातच होते.

चार तास युक्तिवाद, न्यायालयाचा ठाम निष्कर्ष

आज सकाळपासून न्यायालयात उज्ज्वला थिटे, प्राजक्ता पाटील आणि सरकार पक्षाच्या वकिलांकडून सलग चार तास युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंची मते सविस्तर ऐकल्यानंतर न्यायालयाने थिटे यांचे अपील फेटाळून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला.

उमेदवारी अर्जातील सही खोडण्यात आल्याचा गंभीर आरोप थिटे यांनी केला होता. मात्र, “जर सही खोडली असेल तर पोलिसांत तक्रार का नाही?” असा प्रतिप्रश्न सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी उपस्थित केला. निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांनुसारच काम केल्याचेही त्यांनी कोर्टात स्पष्ट केले.

थिटेंच्या वकिलांचा आरोप – ‘प्रशासनाचा फ्रॉड’

उज्ज्वला थिटे यांच्या वकिलांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळे, कारभारातील अनियमितता आणि अर्जातील सही गायब करण्याचा प्रशासनाकडून ‘फ्रॉड’ झाल्याचा दावा केला. जवळपास दीड तास त्यांनी तक्रारींचा पाढा कोर्टात वाचला. मात्र त्यांच्या युक्तिवादाला न्यायालयाने मान्यता दिली नाही.

निर्णयानंतर थिटे यांचे वकील दत्तात्रय घोडके यांनी सांगितले, “आमचा अपील अर्ज फेटाळला गेला आहे. निर्णयाचे नेमके आधार उद्या सविस्तर आदेशानंतर कळतील.”

प्राजक्ता पाटील यांच्या वकिलांची भूमिका

प्राजक्ता पाटील यांच्या वतीने अॅड. महेश जगताप यांनी युक्तिवाद करत सांगितले की, “या प्रकरणाचा आमच्या उमेदवाराशी काहीही संबंध नाही. आक्षेप अपक्ष उमेदवाराने घेतला होता. थिटे राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत, आणि पक्षातील अंतर्गत राजकारणातूनच ही सगळी कारस्थाने झाली.”

बिनविरोध निवडीला अखेर हिरवा कंदील

या निकालामुळे अनगर नगराध्यक्षा पदासाठीची बिनविरोध निवड प्रक्रिया कोणत्याही कायदेशीर अडथळ्याविना पूर्ण झाली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्राजक्ता पाटील यांच्या बिनविरोध विजयानावर आता कोणतीही ‘टांगती तलवार’ राहिलेली नाही.

अनगरच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अनिश्चितता आजच्या निकालाने संपुष्टात आली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णयच अंतिम ठरला आहे. 

न्यायालयाचा निर्णय मान्य असून आम्ही न्यायालयाचा नेहमीच आदर करीत असतो व आहोत. - - माजी आमदार राजन पाटील  

तांत्रिक मुद्द्यांवर जरी न्यायालयात आम्ही हारलो असलो तरी जनतेच्या न्यायालयात आम्ही जिंकलो आहोत. - उमेश पाटील

Reactions

Post a Comment

0 Comments