लोकमंगलचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवारी होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 13, 2025

लोकमंगलचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवारी होणार

 लोकमंगलचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवारी होणार
५१ जोडपी विवाह बंधनात अडकणार-आमदार सुभाष देशमुख यांची माहिती


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनतर्फे यावर्षीदेखील सर्वधर्मीय सामुदायिक विवाह
सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा ४६ वा सामुदायिक विवाह सोहळा रविवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०५.०८ वाजता, गोरज मुहूर्तावर विजापूर रोड येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. यंदाचे विवाह सोहळ्याचे २० वे वर्ष असून यावेळी ५१ जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती लोकमंगल संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व नववधू-वरांच्या कुटुंबांना दिलासा मिळावा हा उद्देश असून,
विवाहासाठी आवश्यक सर्व खर्च लोकमंगल फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे. वधू-वरांना उपयोगी पडणाऱ्या गृहउपयोगी साहित्याची भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे. यामध्ये मणी, मंगळसूत्र, जोडवी, वर व वधूस हळदीचे व अक्षदेचे कपडे, रुखवत भांडी साहित्य, फेटा, बूट, चप्पल, वधूला चुनरी, मुंडावळी, वधू वर मेकअप आदींचा समावेश आहे. भांडी साहित्य ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, बाळकृष्ण, स्टील हंडा, तांब्या, २ डबे, व १ बॅग देण्यात येणार आहे. भोजन व्यवस्थेपासून ते नववधू-वरांचे कपडे व सर्व सुविधा फाउंडेशनतर्फे पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय वधू वरांची शहरातील प्रमुख मार्गाने रथामधून मिरवणूकही काढण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत. यंदा ५१ जोडप्यांमध्ये २ दिव्यांग जोडप्यांचा समावेश आहे. ३ बौद्ध जोडपे तसेच ४८ हिंदू जोडपे आहेत.
सोहळ्याचे संपूर्ण स्थळ २५० बाय २०० फूट क्षेत्रफळामध्ये तयार करण्यात येणार असून भोजन व्यवस्था
९० बाय १५० फूट जागेत असेल. संपूर्ण कार्यक्रम स्थळावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या विवाह सोहळ्यात दोन्हीकडील सुमारे २५-३० हजार वऱ्हाडी मंडळींना भोजनाची सोय करण्यात आली आहे. भोजनात चपाती, भाजी, भात व बुंदी याचा समावेश असणार आहे. याशिवाय दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवविवाहित जोडप्यांना संसार सुखाचा करण्याबाबत सूचना देणारा समुपदेशनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.
आतापर्यंत ३१५३ जोडपी विवाहबद्ध
लोकमंगल फाउंडेशनमार्फत एकूण ४६ सामूहिक विवाह सोहळे पार पडले आहेत. आतापर्यंत ३१५३
जोडपी विवाहबद्ध झाली असून त्यापैकी – हिंदू : २४४३ जोडपी, बौद्ध : ६७८ जोडपी,मुस्लिम : २१ जोडपी, ख्रिश्चन : ०४ जोडपी, जैन : ०७ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.
सोहळ्यात जपणार सामाजिक भान
उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या आरोग्यासाठी तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल. ऐच्छिक
रक्तदान करण्यासाठी रक्तदान शिबिराचे स्वतंत्र दालन केले जाणार आहे. मनोरंजनासाठी सामाजिक प्रबोधन करणारा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. वधू-वरांचे भावी जीवन समाधानकारक व सुखी व्हावे यासाठी मान्यवर समुपदेशक व डॉक्टरांच्या मार्फत समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यांना सरकारी कन्यादान योजनेंअंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशन कडून विशेष प्रयत्न करण्यात येतील.
लोकमंगलचा मदतीचा हात समाजामधील स्त्री भ्रूणहत्या, आत्महत्या रोखण्यासाठी लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यास प्रथम मुलगी झालेल्या जोडप्यांना त्या मुलीच्या नावे २ हजार रूपयांची ठेव लोकमंगल फाउंडेशन व त्या मुलीच्या नावाने संयुक्त खात्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आजपर्यंत अशा समुदायिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यांच्या २४० पेक्षा जास्त मुलींच्या नावे ठेव ठेवण्यात आलेली आहे. लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यास त्यांच्या योग्यतेप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते. आजपर्यंत अशा २५० जावयांना रोजगार देण्यात आला आहे. याच बरोबर वधू-वरास कोणता व्यवसाय करावयाचा असेल तर विशेष बाब म्हणून लोकमंगलच्या वतीने कर्ज देखील मिळवून दिले जाते. याशिवाय वैवाहिक जीवनात काही अडचण आल्यास वधू-वरांना समुपदेशनही करण्यात येते. जिल्हा पर्यटनाच्या थीमवर आगळावेगळा विवाह सोहळा यंदा आयोजित करण्यात येणाऱ्या विवाह सोहळ्याला 'जिल्हा पर्यटन' ही विशेष थीम देण्यात आली आहे. आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'जिल्हा पर्यटन महोत्सवाच्या' धर्तीवर, या विवाह सोहळ्यातही जिल्ह्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
विवाह सोहळा आयोजित करण्यात येणाऱ्या मैदानावर सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांची वैशिष्ट्ये,
पर्यटनस्थळे आणि वारसा स्थळांची माहिती आकर्षक पद्धतीने प्रदर्शित केली जाणार आहे. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची स्थळे, सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि लोकपरंपरा दर्शविणारे पॅनेल्स, माहितीफलक आणि सजावटीची मांडणी हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
विशेष म्हणजे, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती सोहळा स्थळी प्रतिष्ठापित
करण्यात येणार असून,' “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हा प्रेरणादायी संदेशही झळकविण्यात येणार आहे.
जिल्हा पर्यटनाची झलक, अध्यात्माचा स्पर्श आणि सांस्कृतिक वारशाची उजळणी यामुळे हा विवाह
सोहळा सर्वांसाठी एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages