वाशिंबे ते केत्तुर नं.१ रस्त्याची लागली वाट
वाशिंबे (सचिन भोईटे):- मौजे वाशिंबे ता.करमाळा जि.प.शाळेपासून ते केत्तूर न.१ ग्रामा १२५ या चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली असून, खड्डातून मार्ग काढत या रस्त्याने वाशिंबे परिसर ,केत्तूर १ व गोयेगाव येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. केत्तूर १,गोयेगाव या गावांना तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. उजनी बॅक वॉटर लगत गावे असल्याने केळी व ऊस पिकांची याच रस्त्याने मोठी वाहतूक केली जाते. दिवाळीनंतर ऊस सीजन सुरू होणार आहे. त्यामुळे आणखी रस्त्याची दुरावस्था बिकट होणार आहे. वाशिंबे व केत्तुर १ येथे मोठी दोन शैक्षणिक विद्यालय आहेत. शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्या लगत वाढलेली झाडे -झुडपे व खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना विशेषता धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नाहीत त्यामुळे अचानक ब्रेक मारल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत पडलेले खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अशी या परिसरातील नागरिकांकडून मागणी केली जात आहे.
चौकट -
वाशिंबे ते केत्तुर १ या रस्त्याचे खड्डे ही समस्या गंभीर बनली आहे.त्यामुळे प्रशासनाने तत्काळ दखल घेत खड्डे बुजवावेत.
- मयुर झोळ
वाशिंबे
रस्त्यांची दुरावस्था झाल्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत .खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील बजेट मध्ये रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून देऊ.
- नारायण पाटील
आमदार करमाळा
रस्त्या लगत वाढलेली झाडे - झुडपे आठ दिवसांत काढण्यात येतील.व पावसाळा संपताच त्वरित या रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील.
- अभिषेक पवार
अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग,करमाळा
0 Comments