रुपाली चाकणकर आता तरी राजीनामा देणार का? पवारांच्या राष्ट्रवादीचा सवाल
मुंबई (कटूसत्य वृत्त):- जोतिष, तंत्र मंत्राच्या नावाखाली महिलेचं शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशोक खरात याची पाद्यपूजा करणाऱ्या रुपाली चाकणकरांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली.
तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
अशोक खरातच्या सेवेकरी भक्त असलेल्या आणि कोणत्याही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसलेल्या रुपाली चाकणकर आता तरी महिला आयोगाच्या व पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देतील का? त्यांचा पक्ष त्यांना किती दिवस पाठीशी घालणार आहे? असा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विचारण्यात आला.
विकास लवांडे म्हणाले की, "अशोक खरातसारख्या सर्वच भ्रष्टाचारी लोकांना भाजपकडून अभय मिळतंय. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताहेत, त्यांची सेवा करत आहेत. अशोक खरातसोबतचे रुपाली चाकणकरांचे फोटो पाहून खंत वाटते. आता तरी त्या राजीनामा देतील का?"
रुपाली चाकणकरांच्या अनेक चुका या गंभीर स्वरुपाच्या असून त्या आतापर्यंत दडपल्या आहेत. आता या घटनेनंतर तरी त्यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न विकास लवांडे यांनी विचारला.
आरोपांबाबत मला कल्पना नाही
दरम्यान, झालेल्या आरोपांवर रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॅप्टन खरातांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर आपला पूर्ण विश्वास आहे असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं.
गुंगीचे औषध देऊन अत्याचार
नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदूबाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. या मांत्रिकाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हीडिओही पोलीस तपासात उघडकीस आले आहेत. सिन्नर तालुक्यात अशोक खरातने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केलीं आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता.

No comments:
Post a Comment