Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात पूरस्थिती कायम; भीमा-सीनेच्या पुराने जनजीवन विस्कळीत

 जिल्ह्यात पूरस्थिती कायम; भीमा-सीनेच्या पुराने जनजीवन विस्कळीत




शेतकरी उध्वस्त, सर्व स्तरावरून मदतीची गरज

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यावर ओढवलेल्या पूरपरिस्थितीने भीषण रूप धारण केले आहे. महापुराचा जोर ओसरत असतानाच उजनी धरणातून वाढीव विसर्गामुळे पुन्हा एकदा भीमा व सीना नद्यांना पूर आला असून, जिल्ह्यातील अनेक भागांत पूरस्थिती कायम आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शेतकरी वर्ग पुरता उध्वस्त झाला आहे.

उजनी धरणाचा विसर्ग आणि भीमा नदीवर पूराचे सावट

गेल्या दोन दिवसांत उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. या विसर्गामुळे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यांमध्ये भीमा नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. सीना नदीतून रविवारी सायंकाळपर्यंत १.६० लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या संगमाजवळ एकूण २.५ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने भीमा नदीने रौद्ररूप धारण केले आहे.

सीना नदीचा कहर सुरूच

सीना नदीची महापुराची स्थिती अजूनही गंभीर आहे. सोलापूर जिल्हा, भूम, परंडा आणि अहिल्यानगर या सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली. रविवारी दुपारी सीना नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापूर बंधारा (वडकबाळ), सिंदखेड, बंदलगी आणि कोर्सेगाव येथील बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत.

भीमा नदी सातव्यांदा पुराच्या स्थितीत

सद्यस्थितीत अळगी, खानापूर व हिळ्ळी येथील बंधारे पाण्याखाली असून, हिळ्ळी येथे सध्या १.४४ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदाच्या वर्षी भीमा नदीला सातव्यांदा, सीना नदीला दुसऱ्यांदा आणि आदी नदीला चौथ्यांदा पूर आला आहे.

माण नदीचा विसर्ग थोडक्याच प्रमाणात कमी

सातारा जिल्ह्यातील म्हसवड मध्यम प्रकल्पातून शनिवारी रात्रीपासून ११ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. रविवारी सकाळपासून हा विसर्ग ८७०० क्युसेक इतका करण्यात आला, मात्र हा विसर्ग अद्यापही अनियंत्रित असल्यामुळे भविष्यात पाण्याच्या विसर्गात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

सोलापूरकरांना थोडासा दिलासा

रविवारी सोलापूर शहरात दिवसभर उन्हाचे दर्शन झाले. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी सीना नदीच्या पुरामुळे निर्माण झालेली भीती अद्याप कायम आहे. गेल्या आठवड्याभरात सात तालुक्यांत महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पूरामुळे शेतकरी उध्वस्त, लाखो रुपयांचे नुकसान

सोलापूर जिल्हा दुष्काळी म्हणून ओळखला जात असला तरी, गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यंदाचा पूर शेतकऱ्यांसाठी मोठा आघात ठरला आहे. शेतांमध्ये उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी घरात, रस्त्यावर आणि शिवारात पुराचे पाणी शिरले. सरकारी आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ७२९ गावांना पूराचा फटका बसला आहे.

यामध्ये ६ जणांचा मृत्यू, ४९ जनावरांचा व १५,००० पेक्षा अधिक कुक्कुटपालन पक्ष्यांचा बळी गेला आहे. ५४१ घरांची पडझड, तर २.२२ लाख शेतकरी बाधित आणि १.९५ लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे.

'स्मार्ट सिटी'तही पाणीच पाणी

सोलापूर शहरात सलग दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भाग जलमय झाले. शहरातील ओढे, नाले बुजवून झालेली अनियंत्रित बांधकामे आणि नियोजनशून्य विकास हे या परिस्थितीला कारणीभूत ठरले आहेत. सोलापूर-तुळजापूर महामार्गावरदेखील पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

नदीलगतच्या तालुक्यांमध्ये मोठा फटका

सीना नदीमुळे करमाळा, माढा, मोहोळ या तालुक्यांतील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. घरात, शेतात आणि महामार्गांवर पाणीच पाणी असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली असून, जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे.

पुनर्वसनासाठी मोठा कालावधी लागणार

सरकारी मदत जाहीर झाली असली तरी, उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी किमान एक ते दोन वर्षांचा कालावधी लागेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उभे पिके वाहून गेली असून, संसार उपयोगी वस्तूंचीही नासधूस झाली आहे.

चौकट
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार जमा होणार

महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात नद्यांना आलेल्या महापूरमुळे अनेक गवे प्रभावित झाले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी पत्रकारपरिषद मध्ये सांगितले की, १ ऑक्टोंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १०,००० रुपये जमा करण्यात येणार आहे.
तसेच त्यांनी बाधित क्षेत्राची देखील माहिती दिली. ते म्हणाले की, सरकारने पूर प्रभावित नागरिकांसाठी तांदूळ आणि गहू पुरवण्याचे आदेश दिले आहे. तसेच हे धान्य वाटप सुरु झाले असून नागरिकांना आर्थिक मदत देखील पुरवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे पुरामुळे प्रभावित झाले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments