अनुदान विचारले केली म्हणून अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला बुटाने मारहाण
वाशिम / सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- शेतमालाला हमीभाव नाही, कर्जमाफी नाही, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई नाही, आणि आता आपल्या हक्काच्या अनुदानाबाबत विचारणा केली तर थेट बुटाने मारहाण अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची राज्यातील सरकार व प्रशासनाने करून ठेवली असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेअंतर्गत संत्रा फळबागेसाठी मंजूर अनुदान रखडल्याबाबत एका शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्याकडे विचारणा केली. मात्र या साध्या प्रश्नालाच अधिकाऱ्याने आक्रमक प्रतिसाद देत शेतकऱ्याला बुटाने आणि मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
“शासनाच्या योजनांबाबत विचारणाही शेतकऱ्यांनी करायची नाही का?” असा सवाल उपस्थित होत असून, ही घटना म्हणजे कृषी प्रशासनाची मुजोरी आणि शेतकऱ्यांविषयी असलेली घृणास्पद मानसिकता उघड करणारी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या प्रकरणावर राजकीय वर्तुळातूनही तीव्र शब्दांत टीका करण्यात येत आहे. “फडणवीस सरकार शेतकरीविरोधी आहे, हे वारंवार सिद्ध होत आहे. एकीकडे सरकारमधील लोक शेतकऱ्यांसाठी अपमानास्पद भाषा वापरतात, तर दुसरीकडे मुजोर सरकारी अधिकारी थेट शेतकऱ्यांवर बुटाने हल्ला करतात. ही भाषा आणि ही कृती दोन्ही शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारी आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
या घटनेनंतर संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनासह कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांकडून केली जात आहे. “शेतकऱ्यांवर अन्याय करून दादागिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना जर शासन संरक्षण देत असेल, तर तो शेतकऱ्यांवरील अन्यायच ठरेल,” असा इशाराही देण्यात येत आहे.
या प्रकरणावर शासन व कृषी विभाग काय भूमिका घेतो, दोषींवर कारवाई होते की नाही, याकडे राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले असून, या घटनेमुळे कृषी प्रशासनाची विश्वासार्हता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
No comments:
Post a Comment