Hot Posts

6/recent/ticker-posts

आरक्षणविरोधकांना मतदान करू नका” मराठा समाजाला जरांगे पाटलांचा कडवा संदेश

 आरक्षणविरोधकांना मतदान करू नका” मराठा समाजाला जरांगे पाटलांचा कडवा संदेश



बुलढाणा सोलापूर (कटूसत्य वृत्त): राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, येत्या १५ जानेवारी रोजी राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महापालिका निवडणुकीसंदर्भात प्रथमच थेट आणि स्पष्ट भूमिका जाहीर केली असून, त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

बुलढाणा येथे आयोजित सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील मतदारांना आवाहन करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जे नेते आणि पक्ष मराठा आरक्षणाच्या विरोधात उभे राहिले, तेच आज महापालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे आहेत. अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत मतदान करू नका.”

आपल्या भाषणात जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना म्हटले की, “या सरकारने मराठे, मुस्लिम आणि दलित समाजाला काडीला लावून टाकले आहे. त्यामुळे आता मराठ्यांनी फक्त शांत राहण्याची भूमिका न घेता कट्टर आणि कडवट भूमिका घ्यावी. इतकी खुन्नस ठेवली पाहिजे की, यांना मतदानच मिळू नये.”

निवडणूक काळातील कथित पैशांच्या वापरावरही त्यांनी गंभीर आरोप केले. “निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप होत नाही, तर पैसे वाटलेच जात आहेत. यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. आधी यांच्याकडे काय होतं आणि आता काय आहे, हे जनतेला दिसत आहे. शर्टामधून दिसतील इतकी नोटांची बंडलं घेऊन फिरतात, नोटा वाटतात आणि घोळ घालतात,” असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

महापालिका निवडणुकांतील राजकीय युतींवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले की, “कुठे राष्ट्रवादीसोबत जमतं, कुठे भाजप-शिवसेनेसह, तर कुठे काँग्रेससोबतही युती होते. म्हणजे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे सगळे एकत्रच आहेत. मग यांचे शत्रू कोण? आम्हीच ना गोरगरीब जनता?”

“आपल्या पक्षाचा नेता निवडून यायला हवा, मग युती कुणासोबतही करा, हाच यांचा अजेंडा आहे. लोकांना वाटतं की पर्याय नाहीत. पण लोकांना एकदा पर्याय मिळू द्या, मग जनता यांना कसं उलटंपालटं करते ते बघा,” असे आव्हानात्मक विधान त्यांनी केले.

आपली भूमिका स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, “मी जिल्हा परिषद, नगरपालिका किंवा स्थानिक पातळीच्या निवडणुकीत थेट पडत नाही. पण जर एखाद्या सत्ताधाऱ्याला माज आला असेल, तर तो माज उतरवल्याशिवाय मी गप्प बसत नाही. आपल्याला टप्पू मासा लागतो, तो लागलाच पाहिजे,” असे सूचक विधान त्यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे महापालिका निवडणुकीत विशेषतः मराठा समाजाच्या मतांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. आरक्षण, पैसा आणि युतीच्या राजकारणावर केलेली ही टीका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोठा प्रभाव टाकू शकते.

राज्यातील महापालिका निवडणूक निकालांमध्ये या आवाहनाचा किती परिणाम होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments