लोकमंगल कृषी महाविद्यालया मार्फत कौठाळी विद्यालयात कृषी पर्यटन व्याख्यान आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककामार्फत पर्यटन दिनाचे औचित्य साधून कृषी पर्यटन या विषयावरील व्याख्यान कौठाळी विद्यालय, कौठाळी तालुका उत्तर सोलापूर येथे दिनांक २० सप्टेंबर रोजी संपन्न झाले. सदरील मार्गदर्शन व्याख्यानास प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे हे लाभले होते. कौठाळी विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक श्री. शिरसट सर यांनी प्रास्ताविका मधून विद्यार्थ्यांना लोकमंगल शैक्षणिक समूहाच्या समृद्ध गाव योजना आणि अन्नपूर्णा योजना याविषयी माहिती दिली. प्रा. अजित कुरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. श्री. सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या दिनांक २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीतील पर्यटन सप्ताहाबाबत माहिती दिली. याच पर्यटन सप्ताहाचे औचित्य साधून विद्यालयातील इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांकरिता कृषी पर्यटन या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानामध्ये प्रामुख्याने कृषी क्षेत्राशी निगडित व्यावसायिक पर्यटन संकल्पना विद्यार्थ्यांना उलगडून सांगण्यात आली. पारंपारिक शेती समवेत उत्पन्नाचे पर्यायी साधन म्हणून भविष्यात कृषी पर्यटनाचे असणारे महत्त्व या व्याख्याना द्वारे विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कृषी पर्यटनाबाबतीत जिज्ञासु वृत्तीने माहिती जाणून घेतली. व्याख्यान आयोजनासोबतच लोकमंगल कृषी महाविद्यालयातील रासेयो एककातील स्वयंसेवकांनी शालेय विद्यार्थ्यांसमोर अक्षय ऊर्जा आधारित मॉडेल्सचे सादरीकरण केले. महाविद्यालया द्वारे राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरवसे सर व शालेय समितीद्वारे लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आणि अन्नपूर्णा योजनेत एक मूठभर धान्य ही संकल्पना शाळेत राबविण्याचा संकल्प देखील करण्यात आला. सदरील उपक्रमांच्या आयोजनासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील रासेयो स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments