Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनाला मोठी संधी- आ.सुभाष देशमुख

 सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनाला  मोठी संधी- आ.सुभाष देशमुख 






पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हात पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक ग्रामपंचायतींना या दृष्टीने प्रयत्न करण्याची संधी मिळणार आहे. चिंचणी येथे सात दिवस पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने पर्यावरण दिंडी, महिलांसाठी पारंपरिक खेळ, बाल चित्रपट महोत्सव, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान,आध्यात्मिक कार्यक्रम, वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले. 

सोलापूर जिल्हात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायाला अधिक चालना मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने पर्यटन महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी  पंढरपुरात पत्रकार परिषदेत केले.यामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. 

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात पर्यटन महोत्सव साजरा केला जाणार आहे.पर्यटन महोत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी व स्थानिक नागरिकांनी सहभागी होऊन महोत्सव साजरा करावा असे आवाहन केले. दरम्यान,चिंचणी (ता. पंढरपूर) येथे पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.याच अनुषंगाने २८ सप्टेंबर रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आल्याचेही आमदार देशमुख यांनी सांगितले.

या महोत्सवादरम्यान धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांविषयी लोकांपर्यंत माहिती देणे, कृषी पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने प्रयत्न करणे, व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे, स्थानिक पातळीवर तयार केल्या जाणाऱ्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे, त्यातून रोजगार निर्मिती करणे, पर्यावरण संतुलन राखणे अशा मुद्द्यांवर या महोत्सवामध्ये काम करण्यात येणार आहे.

पंढरपूर, अक्कलकोट, सोलापूर या ठिकाणी धार्मिक पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर संधी आहे.या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा निर्माण केल्यानंतर आणखी पर्यटन वाढण्यास मदत होणार आहे.याबरोबरच कृषी पर्यटनाच्या माध्यमातून देखील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.सोलापूर जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय अधिक वाढावा,यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सदर  महोत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित कंडरे यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत मोहन अनपट यांनी केले. यावेळी अनंता चव्हाण, विजय शेलार, शिवाजी दरेकर, विनोद जगदाळे, गणेश पाटील, समाधान चव्हाण, व लोकमंगल परिवाराचे अनेक मान्यवर उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments