Hot Posts

6/recent/ticker-posts

शाळांना यंदा दिवाळीची १२ दिवस सुट्टी!

 शाळांना यंदा दिवाळीची १२ दिवस सुट्टी!




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना रविवारसहित १२९ दिवस सुट्या आहेत. त्यात दिवाळीची सुटी १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. चालू महिन्यात घटस्थापना (ता. २२) या दिवशी विद्यार्थ्यांना सुटी आहे.  शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात ५३ रविवार आणि सण-उत्सव, महापुरूषांच्या जयंती अशा ७६ सुट्या आहेत. त्यात उन्हाळ्याच्या सुट्या देखील समाविष्ठ आहेत. शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस अध्यापनाचे कार्य व्हावे, असे अपेक्षित आहे. पण, उन्हाळा सुट्यांपूर्वी बहुतेक शाळा पहिली ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उरकत होत्या. त्यामुळे साधारणत: २० एप्रिल ते १४ जून अशी उन्हाळा सुटी असायची. पण, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अंतिम सत्र परीक्षा ८ ते २५ एप्रिल या काळात घ्यावी, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे अध्यापनाचे दिवस नियमानुसार पूर्ण होतील असा त्यामागील उद्देश आहे.
 
चालू शैक्षणिक वर्षात शाळांना ५३ रविवारसहित असणार ७६ सार्वजनिक सुट्या,यंदा दिवाळी सुटी १२ दिवसांची तर २ मेपासून १४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी,८ ते २५ एप्रिल या कालावधीत पार पडणार अंतिम सत्र परीक्षा अन्‌ पॅट चाचणी,दिवाळी सुट्यांपूर्वी पार पडणार शाळांची पहिल्या सत्राची परीक्षा.

दिवाळी सुट्यानंतर २८ ऑक्टोबरपासून सुरू होतील शाळा

दिवाळीपूर्वी सर्व शाळांची प्रथम सत्र (सहामाही) परीक्षा होईल. त्यानंतर १६ ऑक्टोबरपासून शाळांना दिवाळी सुटी असेल. २८ ऑक्टोबरपासून (मंगळवार) पुन्हा शाळा पूर्ववत सुरू होतील.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

शाळांकडून प्रश्नपत्रिकांची तयारी अन्‌ सरावही दिवाळीपूर्वी होणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये सध्या सराव सुरू आहे. शिक्षकांकडून प्रत्येक विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचीही कार्यवाही सुरू आहे. यंदा पहिली ते नववीच्या अंतिम सत्र परीक्षा व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून होणारी 'पॅट' सोपी जाईल, अशा प्रश्नपत्रिका दिवाळीपूर्वीच्या परीक्षेत असणार आहेत.


Reactions

Post a Comment

0 Comments