Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यात Ph.D. विद्यार्थ्यांचे आंदोलन : रोहीत पवारांचे सरकारवर टीकास्त्र

 पुण्यात Ph.D. विद्यार्थ्यांचे आंदोलन : रोहीत पवारांचे सरकारवर टीकास्त्र




पुणे (कटूसत्य वृत्त):- सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांमार्फत फेलोशिपची जाहिरात तातडीने काढावी, तसेच विद्यार्थ्यांना वेळेवर फेलोशिप मिळावी, या प्रमुख मागण्यांसह गेल्या आठवड्यापासून पुण्यात Ph.D. विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलकांची आज आमदार रोहीत पवार यांनी भेट घेऊन त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली.
आंदोलक विद्यार्थ्याची तब्येत बिघडली
आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळे त्याच्या शेतातील सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेले आहे. “एकीकडे अस्मानी संकट आणि दुसरीकडे सरकारचे सुलतानी संकट यामध्ये विद्यार्थी अक्षरशः भरडला जातोय”, अशी टीका पवारांनी केली.
सरकारकडून ढिम्म प्रतिसाद
विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांकडे सरकारने अजूनही गांभीर्याने लक्ष दिले नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे रोहीत पवार यांनी ठासून सांगितले. “फेलोशिपच्या जाहिराती आणि वितरणामध्ये सरकार जाणीवपूर्वक विलंब करते आहे. विद्यार्थ्यांना आश्वासनांवर ठेवून त्यांचे भवितव्य धोक्यात घालण्याचे पाप सुरू आहे”, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क
या पार्श्वभूमीवर पवारांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. “याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ दिला आहे. उशिरा का होईना सरकारने दखल घेतली, त्यांचे आभार; पण फक्त चर्चा करून उपयोग नाही, ठोस निर्णय होणे गरजेचे आहे”, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम
“आज आंदोलन करणारे विद्यार्थी हेच भविष्यातील संशोधक आणि शास्त्रज्ञ आहेत. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे राज्याच्या भविष्यातील प्रगतीकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. आम्ही मात्र या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे आहोत”, असा इशाराही रोहीत पवार यांनी दिला.
Reactions

Post a Comment

0 Comments