स्वेरीत तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- स्वेरीमध्ये सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आपली सुप्त प्रतिभा आणि कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होत असते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळून तांत्रिक बाबींच्या सखोल अभ्यासाची वृत्ती अधिक दृढ होत आहे. या उपक्रमांच्या यशस्वी परंपरेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी 'ऑलम्पस २ के २५' ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा येत्या १५ व १६ सप्टेंबर रोजी स्वेरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नुकतेच या तंत्रस्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश खोडके यांच्या हस्ते करण्यात आले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १५ व दि. १६ सप्टेंबर रोजी आयोजिलेल्या 'ऑलम्पस २ के २५' या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेत इग्नाईटमेक, स्पेल बी, थिंक-बझ टॉक, आर्डइनो चॅलेंज, ब्रिज मेकिंग, सॉईल आर्ट, मिरर कोड, जस्ट अ मिनिट टायपिंग, ई- क्विझ, इलेक्ट्रिकल मास्टर, बिझविझ, टेक क्विझिझ, कॉम्पोनंट्स क्लॅश, कॅड क्लॅश, टेक शार्क्स, कॅम्पस ड्राईव्ह, मिनी-हॅकाथॉन, एस्केप रूम, कॅड रेस, सिव्हिल टेक्नो क्विझ, इलेक्ट्रो एक्स्टेम्पोर, पोस्टर प्रेझेंटेशन, डिस्कसाथॉन असे जवळपास २३ तांत्रिक इव्हेंटस् आहेत. यासाठी विजेत्यांना जवळपास एक लाखांपर्यंतची रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे ही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

0 Comments