ईथे ओशाळला मृत्यू ,माणुसकी मेली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 14, 2025

ईथे ओशाळला मृत्यू ,माणुसकी मेली

          ईथे ओशाळला मृत्यू  ,माणुसकी मेली



 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सध्या सोशल मिडीयामुळे जग जवळ आले आहे म्हणतात.सोशल मिडीयाच्या या आभासी जगात माणुसकीही आभासी झालेली आहे याचे ह्रदयविदारक चीत्र नागपूर-जबलपूर महामार्गावर दीसले.   रक्षाबंधनासाठी गावाला जाताना अपघात झाला आणि पत्नी ग्यारसी अमित यादव (वय ३१) हिचा मृत्यू झाला. रस्त्यावर त्याला कुणीही मदत न केल्याने डोकं सुन्न झालेल्या पती अमित भुरा यादव (वय ३५) याने चक्क पत्नीचा मृतदेह मोटारसायकलवर मागे ठेवून परतीचा प्रवास सुरू केला. त्याच्या या ६५ कि.मी. प्रवासात त्याने चार पोलिस ठाण्यांच्या सीमा ओलांडल्या. महामार्ग वाहतूक पोलिसांनी त्याच्या दुचाकीचा पाठलाग करीत व्हिडीओ क्लिप तयार करून व्हायरल केली. त्याला रोडवर जाताना अनेकांनी बघितले. मात्र, त्याला धीर देत मदत करण्याची माणुसकी कुणीच का दाखवली नाही?

अमित व ग्यारसी मूळचे करणपूर, जिल्हा सिवनी, मध्य प्रदेश येथील रहिवासी. अमित हा पत्नीसह कोराडी नजीकच्या लोणारा येथे भाड्याने राहतो व बांधकामाच्या सेंटिंगची कामे करून उदरनिर्वाह करतो. ते मोटारसायकलने करणपूरला जायला निघाले होते.
सुन्न डोक्याने व घाबरलेल्या अवस्थेत त्याने पत्नीचा मृतदेह चक्क दुचाकीवर मागे बांधला आणि करणपूरला जाण्याऐवजी  लोणारा येथे परत यायला निघाला. सायंकाळी  तो पत्नीचा मृतदेह घेऊन लोणारा येथे घरी पोहोचला.
या अडीच तासांच्या प्रवासात त्याने चार पोलिस ठाण्यांच्या सीमा, टोल प्लाझा, आरटीओ चेकपोस्ट, चार मोठी व किमान १५ छोटी गावे ओलांडली तरी कोणीही विचारपूस केली नाही. दोन महामार्गावर प्रवास करणाऱ्या अनेकांना तो दिसला. पण, कुणाच्या हृदयात माणुसकी जागी झाली नाही. नियंत्रण कक्षाने अमितच्या दुचाकीच्या क्रमांकावरून त्याचा पत्ता शोधला व कोराडी पोलिसांना सूचना दिली. सायंकाळी कोराडी पोलिस त्याच्या घरी पोहोचले, तेव्हा तो घरी पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून होता. पोलिसांनी चौकशी करून मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठविला.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मोरफाट्याजवळ मागून आलेल्या ट्रकने कट मारल्याने दोघेही रस्त्यावर पडले. क्षणभर डोळ्यासमोर अंधारी आली होती. ग्यारसी ही ट्रकच्या बाजूने पडल्याने चाकाखाली आली आणि तिचा मृत्यू झाला. त्यावेळी जोरात पाऊस सुरू होता. तो रोडवरून जाणाऱ्यांना मदत मागत असताना कुणीही त्याच्याजवळ थांबले नाही किंवा पोलिसांना सूचना दिली नाही तेव्हा त्याने पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधला आणि वाटचाल सुरू केली.  या घटनेवरून समाज कीती असंवेदनशील झाला आहे याचे दर्शन घडले. एकीकडे सोशल मिडीयावर माणुसकीच्या दर्शनाचे खोटे व्हीडीओ टाकून पैसे कमावले जात आहेत.खोटी सामाजीक सेवा दाखवली जाते मात्र या घटनेमुळे समाजाच्या असंवेदनशीलतेचा बुरखा फाटला असून अपघाती मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीला मदत करण्याची माणुसकी समाज विसरत चालला असेल तर तांत्रीक प्रगतीच्या गप्पा ही तकलादू आहेत. अमीत यादव वर आज आलेली वेळ ऊद्या कोणावरही येऊ शकते याचा विसर यंत्रणेसह समाजालाही पडू नये.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages