Hot Posts

6/recent/ticker-posts

वडार समाजातर्फे गोपाळकाल्यानिमित्त शनिवारी नगरप्रदक्षिणा

 वडार समाजातर्फे गोपाळकाल्यानिमित्त शनिवारी नगरप्रदक्षिणा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वडार समाजातर्फे गोपाळकाल्यानिमित्त शनिवारी (दि. १६) परंपरेप्रमाणे नगर प्रदक्षिणा होणार आहे.  तब्बल १०८ वर्षांची परंपरा असलेली ही दिंडी शनिवारी दुपारी २.३० वाजता बाळीवेसमधील श्री लक्ष्मण महाराज मंदिरापासून सुरू होणार आहे. तसेच चंद्रनील फाउंडेशनतर्फे दहीहंडीनिमित्त भारतीय सैन्याचा गौरव करणारा देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रनील फाउंडेशनचे अध्यक्ष सी.ए. सुशील बंदपट्टे यांनी दिली.

ह.भ.प. गुरुवर्य श्री लक्ष्मण महाराज यांनी गोपाळकाल्यानिमित्त नगर प्रदक्षिणेची परंपरा सुरू केली. वडार समाजातर्फे शुक्रवारी (दि. १५) रात्री १२ वाजता कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम वडार समाज मारुती मंदिरात होईल. यानंतर शनिवारी (दि.१६) दुपारी २.३० वाजता समाजातील जेष्ठांच्या हस्ते पूजन होऊन नगरप्रदक्षिणेसाठी ही दिंडी लक्ष्मण महाराज प्रशाला येथून मार्गस्थ होणार आहे. येथून बाळीवेस, विजय चौक, चाटी गल्ली, मंगळवार पेठ, मधला मारुती, माणिक चौक, राजवाडे चौक, चौपाड, नवजवान गल्ली, श्री सळई मारुती मंदिरमार्गे वडार गल्लीमध्ये या दिंडीचा समारोप होईल. त्याचबरोबर वडार समाजाचे १५० तरुणांचे गोविंदा पथक असणार आहे.
-------------
चौकट

चंद्रनील फाउंडेशन इतिहासात पहिल्यांदाच हवेत सादर करणार, सन्मानाच्या माध्यमातून भारतीय सैन्याचा गौरव दाखवणारा हलता देखावा - सुशील बंदपट्टे

चंद्रनील फाउंडेशनतर्फे पश्चिम मंगळवार पेठ पोलीस चौकीजवळ दहीहंडी बांधण्यात येणार आहे. यावेळी 'गौरव भारतीय सैन्याच्या शौर्याचा' या संकल्पनेवर आधारित दोन देखावे सादर केले जातील. पहिल्या देखाव्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांचा नायनाट केलेला प्रसंग नागरिकांना दाखवण्यात येणार असून दुसऱ्या देखाव्यात भारतीय सैन्य भारतमातेचे रक्षण करतानाचा हलता देखावा नागरिकांना पाहायला मिळणार आहे. याच ठिकाणी भारतीय सैनिकांच्या वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान चंद्रनील फाउंडेशनतर्फे करण्यात येणार आहे. दहीहंडीचा उत्सव पहायला आलेल्या भाविकांना चंद्रनील फाउंडेशनतर्फे प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत, असे चंद्रनील फाउंडेशनचे अध्यक्ष सी.ए. सुशील बंदपट्टे यांनी सांगितले. या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही बंदपट्टे यांनी केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments