Hot Posts

6/recent/ticker-posts

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट तर्फे लायन्स सेवा पंधरवड्याचा भव्य उपक्रम

 लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट तर्फे लायन्स सेवा पंधरवड्याचा भव्य उपक्रम



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- लायन्स शिशु विकास मंदिर व प्राथमिक शाळा, अक्कलकोट संचलित लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट आणि अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने, लायन्स सेवा पंधरवड्याच्या कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले (सि. बी. खेडगी महाविद्यालय) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थान लायन अभय खोबरे (अध्यक्ष, लायन्स क्लब अक्कलकोट) यांनी भूषवले. स्वागत व प्रास्ताविक प्रो. डॉ. एस. के. मुरूमकर यांनी केले. व्यासपीठावर उपप्राचार्य श्री. कलशट्टी सर, व्याख्याते मा. लायन प्रथमेश कासार तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

मुख्य व्याख्याते मा. लायन प्रथमेश कासार यांनी “व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी व्यक्तिमत्त्व विकास केवळ बाह्य रूपावर नाही तर अंतर्गत विचारसरणी, वर्तन आणि सततची प्रगती यावर अवलंबून असल्याचे स्पष्ट केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की फॅशन आणि सादरीकरण महत्त्वाचे असले तरी, आत्मविश्वास, शिष्टाचार, आणि योग्य संवादकौशल्य हाच खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा पाया असतो. जीवनात स्पष्ट ध्येय निश्चित करणे, त्यासाठी कृती करणे आणि सतत सराव करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शन, सकारात्मक संगत आणि संयम यांच्या बळावर कोणतीही व्यक्ती आपले उद्दिष्ट गाठू शकते. संकटे आणि अडथळे आले तरी “No one can stop you” हा आत्मविश्वास कायम ठेवावा. Persistence आणि Self-Discipline यांचा अवलंब केल्यास यश निश्चित आहे. तसेच व्यसनांपासून दूर राहणे, योग्य सवयी जोपासणे आणि यश मिळेपर्यंत संघर्ष करत राहणे हा त्यांचा ठाम संदेश विद्यार्थ्यांना भावला.

कार्यक्रमात वक्त्याचा परिचय डॉ. ए. पी. हिंडोळे मॅडम यांनी करून दिला. आभार प्रदर्शन डॉ. जी. एस. स्वामी यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. के. डी. थोरे सर यांनी उत्तमरित्या पार पाडले.

या कार्यक्रमास सुमारे दोनशे विद्यार्थी तसेच लायन्स क्लबचे सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्याख्यानाला दाद दिली. कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

लायन्स सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असून, यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, स्वच्छता मोहिमा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यावरण जनजागृती उपक्रम यांचा समावेश आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments