सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- मेरा युवा भारत (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार) यांच्यामार्फत 2025 हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. याचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त 31 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात आज पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेची सुरूवात नियोजन भवन येथे उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली.
जिल्हा प्रशासन, मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय सेवा योजना सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली पदयात्रा नियोजन भवन, सात रस्ता येथून सुरू होऊन रंगभवन, डफरीन चौक मार्गे कामत चौक, संगमेश्वर कॉलेज रोड, सात रस्ता, नियोजन भवन या ठिकाणी या पदयात्रेची सांगता झाली.
यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, प्र. कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ. अतुल लकडे, जिल्हा युवा अधिकारी राहुल डोंगरे, नायब तहसीलदार उत्कर्ष देवकुळे, संचालक राष्ट्रीय सेवा योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर प्रो. डॉ. राजेंद्र वडजे, नदीम शेख क्रीडा अधिकारी व राजू प्याटी, राष्ट्रीय खेळाडू तसेच मेरा युवा भारत सोलापूर, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका, शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि जिल्हा आरोग्य विभाग व आरोग्य पथक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यालबद्दल सविस्तर माहिती देवून देशाला एकात्मतेतून सशक्त व आत्मनिर्भर बनवूया असा संदेश उपस्थित शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला तसेच डॉ. लक्ष्मीकांत दामा यावेळी बोलतांना म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाला व कार्याला डोळ्यासमोर ठेऊन देशाच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी व युवकांनी कार्य करावे. जिल्हा युवा अधिकारी राहूल डोंगरे यांनी प्रास्ताविक भाषण करून राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात देशभक्तीपर गीत व लेजीम नृत्यानी झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली.

0 Comments