मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पीक नुकसानीची जिल्हा प्रशासनाने घ्यावी दखल- सरपंच मनोज महाडीक
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- या आठवडाभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे बक्षी हिप्परगेसह अनेक भागात सर्वत्र पुलावर पाणी आल्यामुळे या गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटलेला आहे. त्यातच शेतकऱ्यांनी परिश्रमानं जोपासलेल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी शासनाकडे केलीय.
गेल्या चार दिवसात दक्षिण सोलापूर तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढले आहे. या पावसामुळे नद्या- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे अनेक गावात नदी आणि ओढ्यांना पूर सदृश्य परिस्थिती आहे. नदी ओढ्यावर आलेल्या पुरामुळे बक्षी हिप्परगे ते सोलापूर जिल्ह्यातील वरळेगांव, वडजी वा मराठवाड्यातील सीमावर्ती भागातील खडकी धोत्री या मार्गाची वाहतूक खंडित झाली आहे. या दिवसात बक्षी हिप्परगे गावाचा सोलापूर शहराशी असलेला संपर्कही खंडित झाला आहे.
आठवडाभरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणी थांबलं असून त्यामुळे खरिपातील तूर, उडीद, सोयाबीन, मुग यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकरी दरवर्षी आपल्या काळ्या आईची ओटी भरण्याच्या भावनेने शेताची संपूर्ण मशागत करून खरिपाची पेरणी करतो, तो आपल्या दैनंदिन गरजांना फाटा तर देतोच, प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा देऊन पीक वाढीसाठी तो दिवस रात्र परिश्रम करतो. यंदा प्रारंभ पासूनच समाधानकारक पाऊस झाल्याने आज शिवारात डोलत असलेली पिके, शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास या मुसळधार पावसामुळे मातीत मिसळला आहे. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना संकट काळात दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी अशी अपेक्षा बक्षी हिप्परगे गावचे सरपंच मनोज महाडिक यांनी बुधवारी सकाळी व्यक्त केलीय.
0 Comments