Hot Posts

6/recent/ticker-posts

रेल्वे पूल होणार लवकरच जमीनदोस्त

 रेल्वे पूल होणार लवकरच जमीनदोस्त



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उद्योग विश्वात सोलापूरचे नाव आघाडीवर असताना, 1922 मध्ये मंगळवेढ्यावरून पंढरपूर, कोल्हापूरसह अन्य शहरांना जोडण्यासाठी येथील भैय्या चौकातील रेल्वेमार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला होता.

हा पूल शहराच्या विकासाचा साक्षीदार आहे. त्या पुलास शंभर वर्षे पूर्ण झाले असून, हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने प्रशासनाकडून हा पूल जमीनदोस्त केला जाणार आहे.

पूलाच्या पाडकामाला प्रशासकीय उच्च स्तरावरून मंजुरीची प्रक्रिया पार पाडली जात आहे. पाडण्यासाठीची मंजुरी मिळताच आधुनिक हायड्रोलिक ब्रेकरसह काँक्रिट क्रशर व कटिंग मशीनच्या मदतीने हा पूल कमी वेळात पाडला जाणार आहे. शहर व दमाणीनगरसह मरिआई चौकाला या ब्रिटिशकालीन पुलाने जोडले गेले होते. आजच्या घडीला या पुलाला 103 वर्षे उलटली आहेत. शंभरी पार होईपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होता. शंभरी पार होताच प्रशासनाने जड वाहतुकीला तो बंद केला. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व रेल्वे प्रशासनाकडून याच्या पाडकामासाठी तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रियेची बाबी पूर्ण केल्या आहेत.

रेल्वेकडून पाडकामाला मंजुरी मिळताच एका दिवसात विशेष तंत्रज्ञानाच्या मदतीने पाडकाम होईल. पाडकाम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल. त्यानंतर नवीन पुलासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून नव्या पुलाची आधुनिक पद्धतीने व दीर्घकाळ टिकेल, अशी निर्मिती होईल. नवीन पुलाच्या कामाची प्रशासकीय स्तरावरील बाबी पूर्ण करून या कामाला सुरुवात होईल.

सोलापूरच्या जडणघडणीत पुलाचे योगदान

या शहराची वस्रोद्योग क्षेत्रात एक स्वतंत्र वेगळी ओळख होती. नरसिंग गिरजी, जाम, लक्ष्मी विष्णू मिल आदी मिलच्या उत्पादनाने सोलापूरचे नाव सातासमुद्रापार गेले होते. या जडणघडणीत या पुलाचे योगदान राहिले आहे, हे नाकारता येत नाही. या पुलाने पंढरपूर, सांगली व कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अन्य शहर जोडले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments