मोहोळ(कटूसत्य वृत्त):- यंदाच्या गळीत हंगामापासून लोकनेते कारखाना चाळीस टक्के ऊस हा यांत्रिक मशिनरीच्या साह्याने तोडणार असून कारखान्याने गव्हाण मशिनरी अद्यावत करण्याबरोबर दोन ट्रिप्लर देखील बसवले आहेत. यंदाच्या वर्षी चाळीस टक्के ऊस यांत्रिक म्हणजे हार्वेस्टर मशीनने आणण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढच्या वर्षी तो पन्नास टक्क्यावर नेण्यात येईल. या प्रयोगाचा सर्वाधिक फायदा ऊस उत्पादकांना होणारा असून यामुळे ऊस वेळेत कारखान्यास येऊन उत्पादकांना
मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी 'पुण्यनगरी'शी बोलताना दिली.
बाळराजे म्हणाले की, ऊस तोडणी कामगारांच्या समस्येबाबत राज्यातील काही कारखान्यांना भेटी देऊन १०० टक्के हार्वेस्टरवरच चालणाऱ्या कारखान्यांच्या कार्यपद्धतीचा आम्ही अभ्यास केला. त्यामधील लातूर जिल्ह्यातील मांजरा कारखान्याचा प्रामुख्याने समावेश आहे. साखर कारखाना क्षेत्रात दिवसेंदिवस ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न जटिल बनत आहे. टोळ्यांकडून होणारी फसवणूक त्याचबरोबर मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची पिळवणूक या बाबी राज्यभर निदर्शनास येत आहेत. ऊस तोडणी कामगार अपेक्षित प्रमाणात आणि वेळेत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस पक्वहोऊनही वेळेत कारखान्यास आणण्यासाठी मर्यादा पडत होत्या. त्यामुळे लोकनेते कारखान्याने यंदाच्या वर्षी चौदा सुशिक्षित युवकांना प्रत्येकी तीस लाख रुपयाची बिनव्याजी रक्कम देऊन त्यामधून ऊस तोडणी मशीन खरेदीसाठी प्रोत्साहन दिले आहे. हा एक अभिनव प्रयोग केल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
0 Comments