सकल मराठा मोर्चाचा एल्गार; सोलापुरातून आतापर्यंत 25 हजार गाड्यांची नोंदणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या चलो मुंबई या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान यावेळचा गणपती आम्ही अरबी समुद्रात विसर्जित करू, मुंबईकरांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन आता सकल मराठा मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर यांनी केले आहे.
राज्यातील लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार
मुंबईत दीड दिवसाचा गणपती असतो, मात्र महाराष्ट्रात दहा ते तेरा दिवसापर्यंत गणपती बसत असतो. यावर्षी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनासाठी राज्यातील लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघणार असून यंदाचा आमचा गणपती अरबी समुद्रात विसर्जित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुंबईकर आमच्या या निर्णयाच्या पाठीशी राहून आम्हालाही अरबी समुद्रात गणपती विसर्जन करू देतील, अशी अपेक्षा धनाजी साखळकर यांनी व्यक्त केली.
25 हजार गाड्यांची नोंदणी, आकडा 50 हजारापर्यंत पोहोचेल असाविश्वास
सोलापूर जिल्ह्यातून आतापर्यंत पंचवीस हजार गाड्यांची नोंदणी झाली असून पुढील तीन दिवसात हा आकडा 50 हजारापर्यंत पोहोचेल, असा विश्वास साखळकर यांनी व्यक्त केला आहे. यंदा घरी गौरी गणपती असूनही मोठ्या संख्येने मराठा महिला या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावाही साखळकर यांनी केला आहे. आज सोलापूर जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी ही सामील झाल्या होत्या.
मांजरसुंबा येथे मनोज जरांगे पाटलांचे होणार एक क्विंटल फुलाच्या हाराने स्वागत
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मुंबईकडे कूच करण्यापूर्वी आज (24 ऑगस्ट ) बीडमध्ये अंतिम निर्णायक सभेचं आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा (Manjarsumbha) येथे ही सभा होणार आहे. आजच्या सभेतून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सरकारला काय इशारा देणार? याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या दरम्यान मराठा आरक्षणाच्या पुढील दिशेबाबत महत्त्वाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे.
अशातच, मराठाआंदोलक मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी बीडच्या मांजरसुबा येथे जोरदार तयारी करण्यात आलीय. क्रेनच्या माध्यमातून एक क्विंटल फुलाच्या हाराने जरांगे पाटील यांचे स्वागत होईल. त्यानंतर महामार्गालगत निर्णायक बैठक होईल. मुंबईला जाण्यापूर्वी होणाऱ्या बैठक आणि सभेतून जरांगे पाटील सरकारला अंतिम इशारा देणार आहेत. आणि याचसाठी मोठ्या संख्येने मराठा समाज मांजरसुंबा येथे दाखल होत आहे.
0 Comments