पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट व्यापाऱ्यांवर अन्यायकारक कारवाई
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सिद्धेश्वर पेठेतील पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट मार्गालगत असलेल्या मुल्लाबाबा ट्रस्ट व सिद्धेश्वर देवस्थान यांच्या खाजगी मालकीच्या जागेवर, १९६० पासून अधिकृत भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या दुकानदार व खोकेधारकांवर सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अन्यायकारक कारवाई सुरू आहे. या कारवाईविरोधात व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, लवकरच संघटनेच्या माध्यमातून पुढील लढ्याची दिशा निश्चित करून लक्षवेधी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सदर रस्ता तीन वेळा रुंदीकरण होऊन बृहत आराखड्यानुसार सुधारित करण्यात आलेला आहे. सध्याच्या स्थितीत, तो दोन्ही बाजूंनी फुटपाथसह सुमारे १८ मीटर रुंद आहे. येथील दुकाने व खोके हे सर्व नियमानुसार रस्त्याच्या मर्यादेच्या आत असून कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. संबंधित व्यापारी वर्ग महानगरपालिकेला नियमित कर भरणा करतो, शिवाय दुकानांच्या दुरुस्ती, देखभालीसाठीही त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे.
"सदर जागा अतिक्रमणाची आहे" या कारणास्तव सुरू असलेली कारवाई ही वस्तुस्थितीला धरून नाही, तर ती जाचक, अन्यायकारक आणि मनमानी स्वरूपाची असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही कारवाई त्वरित थांबवून न्याय दिला जावा, अन्यथा रस्त्यावरची लढाई करण्याचा असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर लाल बावटा फेरीवाले, चारचाकी, खोकेधारक श्रमिक संघटना (सीटू संलग्न) यांच्या वतीने गुरुवार, दि.१७ जुलै रोजी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ सोलापूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या शिष्टमंडळात माकपचे जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख मेजर, माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. अकील शेख, खाजाभाई करजगी यांचा समावेश होता. सादर निवेदनात नमूद करण्यात आले की, शहरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था आणि रस्ते विकासासाठी महापालिका उपाययोजना करीत आहे, हे मान्य आहे. मात्र प्रत्यक्ष अतिक्रमण नसतानाही काही व्यापारी व रहिवासी भागांमध्ये अतिक्रमण विभागाकडून अन्यायकारक कारवाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
यावेळी गणेश माने, मुजावर मोहम्मद शेख, बुडन सिंदगीकर, एजाज मल्लिकार्जुन टोमणे, राजाराम रोहिदास, सिद्धेश्वर फॅब्रिकेशनचे श्रीकांत शिरसागर, किसन संतोष सुरवशे, जावेद पैलवान, करीमभाई लोखंडवाला, मोहम्मद रफीक मोतीवाला, शंकर शांताराम कुसुरकर, मन्नान बेसकर, इमरान शेखानी, पुष्पा माने, मोहसीन नदाफ आदी दुकानदार व खोकेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments