Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर शहराचा भारतात २३ वा तर महाराष्ट्रात ६ व्या क्रमांकाचे मानांकन

 सोलापूर शहराचा भारतात २३ वा तर महाराष्ट्रात ६ व्या क्रमांकाचे मानांकन

 

शहर झाले हागणदारीमुक्त; ओडीएफ प्लस - प्लस अन् थ्री स्टार मानांकन प्राप्त


सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-  स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये ३ ते १० लाख लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये सोलापूर शहरास राष्ट्रीय पातळीवर ६३ क्रमांकावरून २३ वा क्रमांक प्राप्त झाला असून राज्य पातळीवर १४ क्रमांकावरून ६ क्रमांकावर मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच सोलापूर शहरास ओडीएफ प्लस- प्लस व थ्री स्टार मानांकनही प्राप्त झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा यामध्ये सुधारणा झाली आहे.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील स्वच्छता कामकाजाची केंद्र शासनाच्या पथकाकडून दि. २४ ते २९ मार्च २०२५ या कालावधीत सर्व्हेक्षण तपासणी, दि. २२ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत शहरातील सार्वजनिक शौचालयाचे सर्व्हेक्षण आणि दि. २५ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत कचरामुक्त शहर मानांकनासाठी सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचा निकाल गुरूवारी दिल्लीत जाहीर झाला. यामध्ये नागरिकांचा प्रतिसाद आणि महापालिका प्रशासनाचे प्रयत्न याबाबीला गुण दिले जातात. त्यानुसार हे मानांकन दिले गेले आहे.

तसेच या सर्व्हेक्षणात कचरामुक्त शहर म्हणून सोलापूर महापालिकेला १३ स्टार मानांकनही प्राप्त झाले असून शहरातील उघड्यावर शौचास बसण्याची ठिकाणे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. यासाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त रवि पवार, सहायक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार व त्याच्या टिमच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन विभागाने योगदान दिले. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आयुक्तांनी कौतुक केले आहे.


चौकट १

सर्वेक्षणात सोलापूरला मिळाले ९,८१२ गुण

राष्ट्रीय पातळीवरील या सर्व्हेक्षणात एकूण ४ हजार ५८९ शहरांनी सहभाग नोंदविला होता. विविध मुद्दयांच्या आधारावर एकूण १२ हजार ५०० गुणांची ही परीक्षा होती. सोलापूर शहराला यामध्ये एकूण ९ हजार ८१२ गुण मिळाले. महाराष्ट्रात प्रथमस्थानी आलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेला एकूण ११ हजार ६५२ गुण मिळाले. सोलापूर शहराला राष्ट्रीय पातळीवर २३ वा क्रमांक तर महाराष्ट्र राज्य पातळीवर ६ व्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.


चौकट  २

सोलापूरला राज्यात प्रथम आणण्याचा होणार प्रयत्न

 पुढील स्वच्छ सर्व्हेक्षणात सोलापूरचा महाराष्ट्रात प्रथम किंवा द्वितीय क्रमांक आणि भारतात पहिल्या पाच मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. शहरातील नागरिकांनी साथ दिल्यास सर्व काही शक्य आहे. नागरिकांनी ओला व सुका कचरा विलगीकरण करूनच घंटागाडीत टाकावा. स्वच्छ सोलापूर - सुंदर सोलापूर साठी सर्वांनीच हातभार लावावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


चौकट  ३ 

या दहा मुद्दयांवर गुण

या सर्व्हेक्षणात दृश्यमान स्वच्छता, कचऱ्याचे पृथक्करण, संकलन आणि वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छतेची उपलब्धता, वापरलेले पाणी व्यवस्थापन, डिस्लजिंग सेवांचे यांत्रिकीकरण, स्वच्छतेसाठी पुरस्कार, परिसंस्थेचे बळकटीकरण आणि संस्थात्मक मापदंड, स्वच्छता कामगारांचे

एकूण कल्याण, नागरिकांचा अभिप्राय आणि तक्रार निवारण अशा १० मुद्द्यांवर १० हजार गुणांपैकी त्या त्यानुसार गुण देण्यात आले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments