शिवराज्याभिषेकासाठी ६ जूनच का ? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 10, 2025

शिवराज्याभिषेकासाठी ६ जूनच का ?

 शिवराज्याभिषेकासाठी ६ जूनच का ?

आपल्या सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी झाला. तिथीनुसार सांगायचे झाले तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ रोजी शिवराज्याभिषेक साजरा झाला.

शिवप्रेमींकडुन हा सोहळा साजरा व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये तारीख आणि तिथी असा वाद उपस्थित झाला. पण तारीख असो वा तिथी, ही केवळ कालमापनाची परिमाणे आहेत. त्यामुळे हा वाद तसा वरवरचा आहे. मुळाशी जायला कोणी तयार नाही. मूळ विषय हा आहे की शिवराज्याभिषेक हा ६ जून १६७४ किंवा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ याच दिवशी का साजरा झाला ?

याची उकल केली तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर तर मिळेलच, सोबतच छत्रपती शिवरायांना भारतीय उपखंडातील हवामान आणि भौगोलिक परिस्थितीविषयी किती सखोल ज्ञान होते याची प्रचितीही येईल.

छत्रपती शिवरायांच्या काळात नैऋत्य मान्सून वारे, अक्षांश, रेखांश, हवेच्या कमी किंवा जास्त दाबाचे पट्टे, अल निनो-ला निनो वगैरे संकल्पना नव्हत्या. केवळ निरीक्षणं आणि अनुमान यावरच नैसर्गिक स्थितीचा अंदाज लावला जायचा. 

भारतात सर्वसाधारणपणे ७ किंवा ८ जूनला सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. हा दिवस सहसा बदलत नाही. सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश म्हणजे आपल्याकडे अधिकृतरित्या पावसाळ्याची सुरुवात मानली जाते. त्यामुळे दरवर्षी ७ जूनच्या आधीच शेतकरी आपापल्या शेतांची मशागत, जनावरांच्या चाऱ्याची झाकणी, पावसाळाभर पुरेल अशा सरपणाची सोय वगैरे कामे पूर्ण करुन पेरणीसाठी निवांतपणे पावसाची वाट पाहत बसलेला असतो. 

हा असा काळ असतो जेव्हा उन्हाळ्याची धग कमी झालेली असते. आकाश निरभ्र असते. वारे वाहत असतात. अधूनमधून उनसावलीचा खेळ सुरु असतो. वातावरण आल्हाददायक असते.

दुसरी महत्वाची एक गोष्ट म्हणजे एकदा का सह्याद्रीत विशेषतः कोकणात पावसाने मुक्काम ठोकला की तो लवकर जात नाही. नद्या भरुन वाहत असायच्या. वाटा बंद झालेल्या असायच्या. त्यामुळे शत्रू देखील पावसाळ्याच्या काळात सह्याद्रीकडे फिरकायचे धाडस करत नसायचे. त्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील हा काळ योग्य होता.

राज्याभिषेकासाठी गोरगरीब रयतेला, शेतकऱ्यांना येता यावे, शत्रूची भीती नसावी, वातावरण सोयीचे असावे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवरायांनी आपल्या राज्याभिषेकासाठी ६ जून १६७४ किंवा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ हा दिवस निवडला. याठिकाणी पोथी पंचांग नाही, तर महाराजांचा नक्षत्रांचा शास्त्रीय अभ्यास कामी आला. राज्याभिषेक निर्विघ्न आणि मोठ्या आनंदात पार पडला. आपल्या राज्याभिषेकासाठी दिवस निवडताना महाराजांनी पाऊस हा एक महत्वाचा घटक डोळ्यासमोर ठेवला होता.

आज केवळ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आहे म्हणुन तिथीनुसारच शिवराज्याभिषेक करायचा म्हटलं, तर ही तिथी अनेकदा ७ जूनच्या मागेपुढे होते. कधी कधी ती १८ जूनपर्यंत लांबते. अशा काळात कोकणात मुसळधार पावसाची सुरुवात झालेली असते. पायवाटा निसरड्या झालेल्या असतात. दरडी, झाडे कोसळण्याचे प्रकार होतात. प्रवासाच्या दृष्टीने घाटमार्ग सुरक्षित नसतात. त्यामुळे शिवप्रेमींची गैरसोय होते. त्यामानाने ६ जूनला सर्व गोष्टी अनुकूल असतात. 

केवळ तिथीचा अट्टाहास करुन राज्याभिषेक साजरा करायचा आणि शिवरायांनी हा राज्याभिषेक मृग नक्षत्र सुरु व्हायच्या आधीच का करवुन घेतला हे अभ्यासायचे नाही, ही विसंगती आहे. तुम्हाला महाराज डोक्यात घालून न घेता, त्यांना डोक्यावरच घेऊन नाचवायचे असेल तर मग काय उपयोग ?

#शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक लाल- महाल,पुणे

अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages