Hot Posts

6/recent/ticker-posts

संभाजी ब्रिगेडला समाधीवरून नोटीस

संभाजी ब्रिगेडला समाधीवरून नोटीस 

 पुणे (कटूसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ पुरुषोत्तम खेडेकर यांना नजरकैदेत ठेवणारी व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा देणारी नोटीस पुणे येथील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व रायगड पोलिस अधीक्षक यांनी खेडेकरांना दिली आहे. मात्र, खेडकर यांनी वकिलांमार्फत नोटिशीला कायदेशीर उत्तर देताना 'पोलिसांची ही कृती म्हणजे लोकशाहीतील मुस्कटदाबी असून, कारण नसताना जाणीवपूर्वक नोटीस पाठविण्यास आली असल्याचे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधी शेजारी असलेल्या 'वाघ्या' श्वानाच्या समाधीवरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटत चालला आहे. या संदर्भात कोरेगाव पार्क पोलिस ठाणे पुणे व रायगडचे पोलिस अधीक्षक यांनी संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ पुरुषोत्तम खेडेकर यांना 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये' बजावलेल्या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी वाघ्या श्वानाची समाधी आहे. या समाधीचा पुतळा दिनांक ३१ मे रोजी अखेरपर्यंत काढण्यात यावा, अशी भूमिका छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली होती. या भूमिकेला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला असून, 'वाघ्या श्वानाची समाधी संभाजी ब्रिगेड काढणार' अशा आशयाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये सौरभ पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या सदस्यांना स्पष्टपणे सूचित केले आहे की, किल्ले रायगडावर कोणत्याही प्रकारचे दखलपात्र स्वरूपाचे कृत्य घडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, याची सर्वस्वी जबाबदारी सौरभ पुरुषोत्तम खेडेकर यांच्यावर असेल. तसेच, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. ही नोटीस भविष्यात न्यायालयामध्ये पुरावा म्हणून वापरण्यात येईल, असेही यात नमूद केले आहे.

सौरभ खेडकर यांनी अॅड. मिलिंद पवार यांच्यामार्फत पोलिसांना कायदेशीर उत्तर पाठविले असून, ही पोलिसांची कृती म्हणजे लोकशाहीतील मुस्कटदाबी असून, कारण नसताना जाणीवपूर्वक नोटीस पाठविण्यास आली असल्याचे उत्तरात म्हटले आहे. आमच्या नावावर दुसरे कोणीतरी गैरप्रकार करणार व आम्हाला दोषी धरणार हा नोटिशीमागचा व्यापक कट असू शकतो, असे अॅड. मिलिंद पवार यांनी नोटिशीच्या उत्तरात म्हटले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments