चेंगराचेंगरीच्या बारा ठिकाणी २५० पोलीस राहणार तैनात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 17, 2025

चेंगराचेंगरीच्या बारा ठिकाणी २५० पोलीस राहणार तैनात

 चेंगराचेंगरीच्या बारा ठिकाणी २५० पोलीस राहणार तैनात

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी वारीच्या काळात चेंगराचेंगरी होणारी १२ ठिकाणे शासनाकडून निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी २५० पोलीस तैनात करण्यात येतील. याशिवाय सध्या सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण पाहता पालखी विसाव्याच्या ठिकाणी सात लाख चौरस फूट वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.


आषाढी यात्रा तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी ३ लाख  १५ हजार चौरस फूट वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता. यंदा पाऊस जास्त असल्याने पंढरपुरातील पालखी विसाव्याच्या ठिकाणी ७ लाख चौरस फूट मंडप टाकण्यात येणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले.


आषाढी 'सोहळ्यासाठी जिल्ह्यात येणाऱ्या वारकऱ्यांना मूलभूत सुविधा निर्माण करुन देण्यात येत आहेत. सध्या सुरू असलेला पाऊस पाहता वारकऱ्यांना आरोग्यासह अन्य सुविधा पुरविण्यासाठ प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात  येत आहेत. पिण्याचे पाणी, शौचालयांची सुविधाही प्राधान्याने पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी  सांगितले. 



आषाढी वारीनिमित्त बार्शी, माढा व करमाळा या तालुक्यांतून पंढरपूरकडे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत. पालखी मार्गाची पाहणीही पूर्ण करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अडीच पट अधिक मुरुमीकरण करण्यात येत आहे.


पालखी मार्गावरील वारकऱ्यांना आरोग्याची सुविधा देण्यासाठी २१ ठिकाणी प्रत्येकी पाच बेडची आसीयू सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशचे सहकार्य घेण्यात येत आहे. वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची व भोजनाची सोय प्रशासनाकडून करण्यात आली आहे.


वारीत असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा पहिल्यांदाच सर्व प्रशासकीय यंत्रणेचे समन्वय असलेला नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींचे या नियंत्रण कक्षावर नियंत्रण असणार आहे.


वारीच्या काळात दुरध्वनी संपर्कासाठी कर्मचाऱ्यांना १०० वायरलेस फोन देण्यात आले आहेत. याशिवाय ७० ठिकाणी वायफायची सुविधा देण्यात आली असून प्रत्येक ठिकाणी निःशुल्क दुरध्वनी सुविधा वारकऱ्यांसाठी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.


चौकट 

चंद्रभागेतील होडीत फक्त वीस व्यक्तींना परवानगी

आषाढी वारी काळात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. वारी काळात चंद्रभागा नदीत होडीतून प्रवास करताना फक्त २० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय होडीचे फिटींग प्रमाणपत्र तपासूनच त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्या होडीचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages