आता शहराला तीन दिवसाआड पाणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. दोन टप्प्यामध्ये तीन तासाऐवजी अडीच तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद पाहून शहरातील इतर भागात या प्रयोग केला जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.
शहरातील काही भागात पाच दिवसाआड तर काही भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या तीन स्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. त्याशिवाय पाण्याची मागणी कमी झाली आहे. सध्या उजनी - सोलापूर दुहेरी जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाली आहे. चार पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. चार पंप पूर्ण क्षमतेने १७० एमएलडी पाणी उपसा करत आहेत.
त्यामुळे शहराला एक जुलैपासून तीन दिवसाआड तर काही भागात चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणी उपसाही पूर्ण क्षमतेने होत आहे. फ्लो मीटरवर दररोज १७० एमएलडी पाणी उपसा होत असल्याची नोंद आहे. सध्या शहराला तीन तास पाणी दिले जात आहे. या पाण्याचे तास कमी करून ज्या भागात चार दिवसाआड पाणी येते त्या भागाला तीन दिवसाआड तर ज्या भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा आहे. त्या भागाला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे.
या निर्णयाची अंमलबाजावणी १ जुलैपासून केली जाणार आहे. या निर्णयामुळे आता घरातील नळाला तीन तासा ऐवजी दोन ते अडीच तास पाणी येणार आहे. या निर्णयामुळे पाण्याचा एक दिवस आणि अर्धातास पाणी कमी होणार आहे.
चौकट
उपलब्ध पाणीसाठा
औज बंधाऱ्यांतून ११० एमएलडी, उजनी सोलापूर जुनी लाईन ९० एमएलडी उजनी सोलापूर समांतर पाईपलाईन १७० एमएलडी, हिप्परगा तलाव १० एमएलडी असा पाणीसाठा शहरासाठी दररोज ३८० एमएलडी पाणीसाठा उपलब्ध होतो.
चौकट
एका व्यक्तीला दररोज १३५ लिटर पाणी
प्रति दिन प्रति माणसी १३५ लिटर पाणी द्यावे, असा नियम आहे. एका परिवारात आई, वडील आणि दोन मुले असे चार सदस्य गृहीत धरल्यास प्रति माणसी १३५ लिटर प्रमाणे प्रत्येक घरास ५४० लिटर पाणी द्यावे लागते. शहराची लोकसंख्या ११ लाखांच्या आसपास गृहीत धरल्यास उपलब्ध पाणीसाठा आणि दिले जाणारे पाणीसाठा मध्ये मोठी तफावत दिसून येते.
0 Comments