मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- ब्राझील येथील शेतकरी कसे आधुनिक पद्धतीने शेतीत काम करीत आहेत. ऊस उत्पादक शेतकरी कसा उभा राहिला पाहिजे. या बाबतीत एखादी पुस्तिका किवा माहितीपट तयार करून आपल्या भागात त्याचा उपयोग व्हावा, असे मत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी व्यक्त केले.
आमदार अभिजित पाटील यांनी नुकताच ब्राझील येथे शेतीविषयक अभ्यास दौरा केला. यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी मंगळवेढा येथील राष्ट्रवादीचे तसेच शेतकरी गेले असता ते बोलत होते.
सुरुवातीला आमदार अभिजित पाटील यांनी ब्राझील येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कामाच्या पद्धती आणि कृषी तंत्रद्यान बाबत केलेली पाहणी व त्या बद्दलचे अनुभव सांगितले. यावेळी ढोबळे यांनी मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना देखील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातील शेतकरी एकत्र करून एखादा शेतकरी मेळावा घेऊन मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. औदुंबर अण्णा पाटील यांच्या दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयाने शेतकरी समाधानी असल्याचे दिसून येते. तोच वारसा आपण पुढे घेऊन जात शेतकऱ्याना न्याय द्यावा. तसेच उजनी धरणातून पाणी मिळावे. यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांच्या शेतात विठ्ठल पोहचला याची आता सेवा घडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी काँग्रेस मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे, उपसा सिंचन पाणी संघर्ष समितीचे पांडुरंग चौगुले, पांडुरंग जावळे, अण्णा शिरसाट, संदेश काळंगे, ज्ञानेश्वर कोंडूभैरी आदी उपस्थित होते.
0 Comments