Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर पालखी मार्गालगत बिबट्याचा धुमाकूळ

 पंढरपूर पालखी मार्गालगत बिबट्याचा धुमाकूळ

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील पंढरपूर पालखी मार्गालगत असलेल्या पालवन, उजनी माढा, व्होळे खुर्द या भागात बिबट्याचा तब्बल तीन आठवड्यापासून धुमाकूळ सुरु आहे. बिबट्याने आत्तापर्यंत शेळ्या, मेंढ्या, कालवडी, रेडी अशा एक डझन पेक्षा जास्त पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे. चिंतेची बाब म्हणजे हा परिसर पंढरपूर पालखी मार्गाशी संलग्न आहे. बिबट्या सदृश्य प्राण्याच्या वावराच्या ठिकाणापासून श्री क्षेत्र आरण हे केवळ सात किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र कुर्मदास हे सुद्धा केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे. या भागातून वारकरी दिंड्या आषाढी यात्रेसाठी पायी मार्गस्थ होतात.


त्यामुळे वारकरी वर्गांची सुरक्षा ही सुद्धा महत्त्वाची आहे. मात्र या भागात अशा प्रकारचे कोणतेही नियोजन आढळून आलेले नाही.


वन विभागाचे कर्मचारी या भागात येऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी पिंजरे ही लावले आहेत. या पिंजऱ्यात मात्र आतापर्यंत बिबट्या अथवा अन्य कोणताही प्राणी अडकला नाही. शनिवारी रात्री ११ वाजता बिबट्याने व्होळे येथे एका कलवडीस मारले आहे. तीन आठवड्यापासून या भागातील शेतकरी दहशतीखाली वावरत आहेत. सतत बिबट्याचे हल्ले सुरुच आहेत. या परिसरात

तरस हा प्राणी ही सतत आढळून येतो. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या सदृश्य प्राण्याचे ठसे आढळून आलेले आहेत. त्याच प्रमाणे  वाघोटी हा हिंस्र प्राणीही या भागात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किमान चार हिंस्र प्राणी या भागात असण्याची शक्यता आहे. या भागातील ज्ञानदेव परांडे यांनी स्वतः बिबट्या पाहिल्याचे ते सांगतात. वन विभागास मिळालेले पावलांचे ठसे हे बिबट्या सुदृश्य प्राण्याचे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. वन विभागाकडून ड्रोनचा वापर ही करण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत ड्रोनमध्ये कोणताच प्राणी दिसून आलेला नाही. वन विभागाकडून मात्र वारंवार शेतकरी वर्गास सावधानतेचे आवाहन करण्यात येत आहे.


चौकट 

ट्यामुळे जीवन विस्कळीत

व्होळे खुर्द हा पंढरपूर वारी क्षेत्रातील भाग आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त लवकर केला पाहिजे. शेतात जाताना शेतकरी वर्गात भीतीचे वातवरण आहे. कामाला मजूर भेटत नाहीत. लहान मुलांना शाळेत एकटे पाठवणे सुध्दा घातक आहे. आमचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

औदुंबर पाटील, व्होळे खुर्द


चौकट 

सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

उजनी माढा, पालवन, व्होळे येथे प्रत्यक्ष जावून पाहणी केली आहे. या ठिकाणी आढळून आलेले ठसे हे बिबट्या सदृश्य प्राण्याचे आहेत. ड्रोनने तपासणी सुरु आहे. परिसरातील नागरिकांची जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

- वनपाल बाळासाहेब लटके


Reactions

Post a Comment

0 Comments