जि.प. शाळांना आता गुणवत्तेशिवाय पर्याय नाही
अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळांनी गुणवत्तेवर भर देणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा हे मोठे आव्हान बनले असताना शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रित शिक्षणावर भर देत पूर्ण समर्पणाने काम करणे काळाची गरज आहे, असे मत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
अक्कलकोट येथील पंचायत समितीच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' पुरस्कार वितरण आणि निवृत्त शिक्षकांचा सन्मान समारंभ आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांचा गौरव करण्यात आला.
प्राथमिक शाळांमधील विजेत्या शाळा पुढीलप्रमाणे -२०२३- २४ : प्रथम- जि.प.प्रा. शाळा सलगर, द्वितीय- जि.प.प्रा.शाळा गुड्डेवाडी, तृतीय- जि.प.प्रा.शाळा शिरवळवाडी (मराठी), २०२४- २५ : - प्रथम जि.प.प्रा. शाळा गुडेवाडी, निवीय - जि.प.प्रा.शाळा कोर्सेगाव, तृतीय- जि.प.प्रा. शाळा शिरवळवाडी (कन्नड), माध्यमिक शाळांमध्ये- २०२३- २४ प्रथम- काशीविश्वेश्वर हायस्कूल, जेऊर, द्वितीय- मंगरूळे प्रशाला, अक्कलकोट, तृतीय- अनंत चैतन्य प्रशाला, हन्नूर, २०२४-२५ : प्रथम- मंगरूळे प्रशाला, अक्कलकोट, द्वितीय- सुरेखा कल्याणशेट्टी हायस्कूल, अक्कलकोट, तृतीय- कै. एच. एस. पाटील, प्राथमिक आश्रमशाळा, नागनहळ्ळी.
दरम्यान, या कार्यक्रमात तालुक्यातील २९ निवृत्त शिक्षक, दोन केंद्रप्रमुख व दोन विस्तार अधिकाऱ्यांचा गौरव आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी त्यांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी उपस्थित शिक्षक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांशी संवाद साधून शिक्षणक्षेत्रातील आव्हाने व संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात 'शालार्थ पेमेंट स्लिप' या नव्या वेबसाइटचेही लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी निवृत्त केंद्रप्रमुख बापूराव चव्हाण, आयुबखान मुरडी, मानसिंग पवार, शिवाजी शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच कार्यक्रमाने शिक्षकवर्गात उत्साह निर्माण करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवसंजीवनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल डावरे व तुकाराम जाधव यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी यांनी मानले.
0 Comments