केळी उत्पादक संघाची राज्यस्तरीय, केळी परिषद मंगळवारी माढ्यात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 26, 2025

केळी उत्पादक संघाची राज्यस्तरीय, केळी परिषद मंगळवारी माढ्यात

 केळी उत्पादक संघाची राज्यस्तरीय, केळी परिषद मंगळवारी माढ्यात



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाची राज्यस्तरीय 'तिसरी राज्यस्तरीय केळी परिषद' मंगळवारी (ता.२७) माढ्यात होणार आहे. केळीवरील विविध तज्ज्ञांच्या चर्चासत्रांसह प्रदर्शनाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माढ्यातील वैराग रोडवरील जगदाळे मंगल कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता खासदार धैर्यशील मोहीते-पाटील यांच्या हस्ते या परिषदेचे उद्‌घाटन होईल. ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुल माने-पाटील अध्यक्षस्थानी असतील. आमदार अभिजित पाटील, आमदार नारायण पाटील, दादासाहेब साठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दिवसभर चालणाऱ्या केळी परिषदेत केळीतील विविध समस्यांवर उपाययोजनेच्या अनुषंगाने मंथन होणार आहे. त्याशिवाय केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करावा, हमीभाव द्यावा, केळी पिकाचा भाऊसाहेब फुंडकर योजनेत समावेश करावा, यांसह इतर मागण्यांवर ठराव मांडण्यात येणार आहेत. यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात योगेश म्हसे आणि मनोहर पाटील यांचे 'केळी उत्पादन, खत व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

तसेच डॉ. विद्या सोनवणे या 'केळी व आरोग्य' या विषयावर बोलतील. यानिमित्ताने कृषी प्रदर्शनही भरवण्यात आले आहे, राज्यभरातील केळी उत्पादकांनी या परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन चव्हाण यांनी केलं आहे. या वेळी अतुल माने पाटील, डॉ. हनुमंत चिकणे, किशोर चौधरी, छगन गुजर, उत्तम पाटील, राजेश नवाल आदी उपस्थित होते.

राज्य केळी उत्पादक संघाच्या वतीने या परिषदेत तीन पत्रकारांना संभाजीराव चव्हाण आदर्श कृषी पत्रकार पुरस्कार-२०२५ देण्यात येणार आहेत. त्यात 'अॅग्रोवन'चे अकोल्याचे जिल्हा प्रतिनिधी गोपाल हागे यांच्यासह पत्रकार विनायक पाटील (कुर्डुवाडी, जि. सोलापूर) आणि रितेश टिलावत (जि.अकोला) या तिघांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. खासदार मोहिते पाटील यांच्या हस्ते त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असेही किरण चव्हाण यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages