सोलापूर जिल्ह्यातील नवा रेल्वे मार्ग भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याची चौकशी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ते धाराशिवदरम्यान नवा रेल्वे मार्ग साकारला जात आहे. या मार्गासाठी सोलापूर जिल्ह्यातून संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचे मूल्यांकन वाढले आहे. मूल्यांकन का वाढले आहे?
याची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नियुक्त केलेल्या समितीने पडताळणीचे काम सुरू केले आहे. मूल्यांकन का वाढले? याची कारणे देणारा अहवाल समोर येण्याची शक्यता आहे.
अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये भूसंपादन क्र. ७ च्या उपजिल्हाधिकारी सीमा होळकर, उत्तर सोलापूर तालुक्याचे भूमिअभिलेखचे उपअधीक्षक, सहाय्यक नगर रचना कार्यालयाचे सहाय्यक नगर रचना अधिकारी यांचा समावेश आहे. समितीचे सदस्य सचिव म्हणून उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन क्र. १ चे अधिकारी अमोलसिंह भोसले काम पाहात आहेत. या समितीने आतापर्यंत चार ते पाच वेळा बैठका घेतल्या आहेत. समितीने दहा गावातील निवाड्यांची पडताळणी सुरू केली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिव ते तुळजापूर दरम्यानच्या कामांची प्रगती सांगितली आहे. या मार्गाची चाचणी मार्च २०२७ मध्ये होईल, या दृष्टीने कामकाज सुरू आहे. सोलापूर ते तुळजापूर या मार्गाचेही काम गतीने व्हावे, धाराशिव ते सोलापूर असा लोहमार्ग झाल्याशिवाय धाराशिव ते तुळजापूर या लोहमार्गाला फार काही महत्त्व येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर ते तुळजापूर दरम्यानच्या लोहमार्गासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत.
या गावांच्या हद्दीतून लोहमार्ग
सोलापूर ते धाराशिव हा लोहमार्ग जिल्ह्यातील खेड, मार्डी, बाळे, बाणेगाव, भोगाव, देगाव, होनसळ, कसबे सोलापूर, सोलापूर शहरातील मुरारजी पेठ, सेवालाल नगर या गावांच्या हद्दीतून जात आहे. या लोहमार्गासाठी केंद्र सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. राज्य सरकारकडून अपेक्षित सहकार्य व वेळेत काम होत नसल्याने हा मार्ग जलद गतीने सुरू नसल्याचे वारंवार समोर आले होते.
0 Comments