Hot Posts

6/recent/ticker-posts

रेल्वे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

 रेल्वे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर



सोलापूर,(कटुसत्य वृत्त):- रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून समजला जातो. त्यामुळे प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला नेहमीच पसंती देतात. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात गेल्या काहीदिवसांपासून धावत्या रेल्वेवर होत असलेल्या, दगडफेकीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी रात्री मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसवर अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

मुंबईहून निघालेली हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी जेऊर जवळील भाळवणीनजीक आली असता धावत्या रेल्वे गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत प्रवाशांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाला. काही दिवसांपूर्वी टिकेकरवाडीजवळ धावत्या रेल्वेवर झालेल्या दगडफेकीत एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. याशिवाय रेल्वेतून प्रवास करताना दागिने व मोबाइल चोरीचे प्रमाण नित्याचे झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन व सुरक्षा बल यांच्याकडून दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. सोलापूर रेल्वे विभाग हा देशातील अत्यंत महत्त्वाचा विभाग समजला जातो. भारताच्या दक्षिणेला जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे सोलापूर रेल्वे स्थानक होय. भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असताना प्रवाशांवर झालेली दगडफेक ही गंभीर बाब आहे. संवेदनशील
ठिकाणांहून रेल्वेगाडी जात असताना सुरक्षा बलाच्या जवानांकडून देणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी प्रवाशांकडूनही होणे गरजेचे आहे. सोलापूर रेल्वे विभागातून दक्षिणेतील बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, तिरुवअनंतपूरम तर उत्तरेकडील दिल्ली, जयपूर, लखनौ, पटना, मुंबई आदी महानगरांसाठी अनेक सुपरफास्ट एक्स्प्रेस धावतात. यातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे सोलापूर विभागातील सुरक्षा यंत्रणा अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments