गुरुवारपासून विकसित कृषी संकल्प अभियानाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, May 27, 2025

गुरुवारपासून विकसित कृषी संकल्प अभियानाचे आयोजन

 गुरुवारपासून विकसित कृषी संकल्प अभियानाचे आयोजन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय नवी दिल्ली अंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या वतीने कृषीतंत्रज्ञानाची जनजागृती गावोगावी करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान दि. 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
        कृषी विज्ञान केंद्र सोलापूरच्या कार्यक्षेत्रात हे अभियान राबविण्यात येणार आहे. उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मंगळवेढा व बार्शी तालुक्यातील 90 ते 100 गावांमधून या अभियानादरम्यान मार्गदर्शन शिबिरे, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. गुरुवार दि. 29 मे 2025 रोजी सकाळी 9 वाजता बोरामणी येथे या अभियानाचे उद्घाटन खा. प्रणिती शिंदे, आ. सचिन कल्याणशेट्टी ,जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजीव मराठे, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, सोलापूर आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. कांतप्पा खोत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या निमित्ताने विशेष कृषि रथ तयार करण्यात आला आहे.
      दरम्यान आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, आ. देवेंद्र कोठे, आ. दिलीप सोपल, आ. समाधान आवताडे आदी मान्यवर या अभियानामध्ये सहभागी होणार आहेत.शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लालासाहेब तांबडे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस प्रदीप गोंजारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages