कविता मूलद्रव्यांची
निसर्ग, ऋतुचक्र, प्रेम आणि ते देणाऱ्या व्यक्ती.. हे कवितेचे नेहमीचे विषय..मात्र एखाद्या व्यक्तीचे विज्ञानावरच प्रेम असेल तर तो विज्ञानाच्या कविता करणार.. त्यातील सौंदर्य स्थळ शोधणार.. रतीलाल बाबेल हे असेच आजन्म विज्ञानावर निष्ठा बाळगणारे शिक्षक.. त्यांनी चक्क मूलद्रव्यांवर कविता केल्या आहेत… या कवितांमध्ये प्रत्येक मूलद्रव्यांचे केवळ गुणधर्मच सांगितले नाहीत, तर अगदी त्याचे नाव कुठून आले, त्याचा शोध कुणी लावला, त्याचा वापर प्रामुख्याने कुठं होतो यासारख्या बाबींची रंजक मांडणी केली आहे. विद्यार्थ्यांना कळणार देखील नाही की आपण मूलद्रव्यांची इत्यंभूत माहिती इतक्या सहजपणे घेतली आहे.
मूलद्रव्यांच्या कविता असू शकतात ही आयडियाच मुळात खूप भन्नाट आहे आणि या कविता करताना बाबेल सरांची सर्जनशीलता देखील बहरला आलेली जाणवते. विज्ञान शिक्षक रतीलाल बाबेल सर हे आता सेवानिवृत्त झाले आहेत, तत्पूर्वी त्यांनी जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्षपद देखील भूषवले होते.. राज्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना मी आवाहन करेल की सरांच्या संपर्कात रहा, त्यांच्याकडून नवनवीन आयडिया घ्या, तुमच्या आयडिया त्यांना द्या. सरांचा संपर्क देतो, ईमेल आहे ratilalbabel@gmail.com आणि मोबाईल क्रमांक 9860389956. कल्पनांचे आदानप्रदान करणे सरांना नक्की आवडेल.
आवर्तसारणीमध्ये आजमितीला ११८ मूलद्रव्यं आहेत, मात्र त्यातील काही मूलद्रव्यं ही आपल्या दैनंदिन जीवनात पुन्हा पुन्हा डोकावत असतात. अशा मानवाच्या जीवनामध्ये महत्त्वाचे कामगिरी बजावणाऱ्या ३२ मूलद्रव्यांची माहिती या पुस्तकात कवितेच्या माध्यमातून सोपी करून सांगितली आहे. यामध्ये सोने, चांदी, तांबे, लोखंड, फॉस्फरस, गंधक, जस्त, पारा, कॅल्शियम, कार्बन, कोबाल्ट, निऑन, आयोडिन, सोडिअम, ॲल्युमिनियम, क्लोरीन, फ्लोरीन, सिलिकॉन, रेडियम, युरेनियम, बेरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, हेलियम, लँथेंनम, बेरिलियम, टिटॅनियम, लिथियम, बोरॉन, अरगॉन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा समावेश आहे..
मी सायंटिस्ट खोपडी या माझ्या पुस्तकाचे शीर्षक ठरवताना “सायंटिस्ट खोपडी.. बेल ते नोबेल” असे घेतले होते. या पुस्तकात शास्त्रज्ञांचे किस्से सांगताना अलेक्झांडर बेल पासून आल्फ्रेड नोबेलपर्यंत मांडणी केली होती, मात्र या शीर्षकामध्ये “शाळेची बेल पासून नोबेल पारितोषिक” असा देखील आशय अभिप्रेत होता. आता या मूलद्रव्यांच्या कविता वाचताना जाणवले की “शाळेची बेल ते नोबेल व्हाया बाबेल” असा विद्यार्थ्यांचा प्रवास नक्की होऊ शकतो.. कारण त्यांना शालेय जीवनामध्ये असतानाच विज्ञानाची गोडी झालेली असते. त्यांच्यापर्यंत विज्ञानाच्या संकल्पना सोप्या शब्दांमध्ये पोहोचलेल्या असतात. म्हणून कविता मूलद्रव्यांची हे पुस्तक प्रत्येक मराठी विद्यार्थ्यापर्यंत, शाळांमध्ये पोचलं पाहिजे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद देखील झाला आहे आणि तो देखील तेवढाच सुंदर आहे. असं पुस्तक आपल्या संग्रही नक्की असले पाहिजे..
कविता मूलद्रव्यांची
रतीलाल बाबेल
0 Comments