मोहोळ तालुक्यातील कंपन्या
शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत.-आ.राजू खरे
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या चिंचोली एमआयडीसीत कंपन्यांच्या दूषित पाण्यामुळे व प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीची नुकसान भरपाई कंपन्यांकडून वसूल करावी, अशी मागणी आमदार राजू खरे यांनी पर्यावरण मंत्री व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अध्यक्षांकडे केली आहे.
आ. खरे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरातील ओ.सी. कंपनी, छल्ला कंपनी, फरफर कंपनी, बासवा कंपनी, अँबो आर्यन कंपनी, कृष्णा केमिकल कंपनी या सर्व कंपन्या वेगवेगळे उत्पादन करतात. या कंपन्यांच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे दूषित पाण्यामुळे व प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या कंपन्यांनी सोडलेल्या घाण पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीला केमिकलयुक्त पाण्याचा वास येतो. वरील सर्व कंपन्यांच्या दूषित पाण्यामुळे व प्रदूषणामुळे आजूबाजूच्या गावातील हजारो एकर जमीन नापीक झाली आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रदूषण व दूषित पाणी न सोडण्याबाबत किंवा त्याची विल्हेवाट व्यवस्थितपणे लावण्याबाबत शेतकऱ्यांनी अनेकवेळा विनंती केली. मात्र कोणाचातरी वरदहस्त असल्यामुळे कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांचे ऐकत नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे निवेदने दिली आहेत. त्या निवेदनामध्ये शेतकऱ्यांनी शेतीचे होणाऱ्या नुकसानीची भरपाई कंपनीकडून वसूल करण्यात यावी, तसेच कंपनीवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी. शेतकरी कंपनी अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाने हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये प्रदूषण व दूषित पाण्यामुळे कोणतेही पीक येत नाही. शेतकऱ्यांचा प्रपंच उघड्यावर पडला आहे. यासाठी माझ्या समवेत आपल्या अध्यक्षतेखाली शेतकरी, प्रतिनिधी व वरील कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करावी. अशा आशयाचे पत्र आमदार राजू खरे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना दिले आहे.
राजू खरे, आमदार
एकीकडे शेतीमालाला भाव नाही, पिकांच्या पाण्याचे योग्य नियोजन नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसीतील कंपन्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही.
0 Comments