Hot Posts

6/recent/ticker-posts

९ महिन्यानंतरही दूध उत्पादक अनुदानाच्या प्रतीक्षेत

 ९ महिन्यानंतरही दूध उत्पादक अनुदानाच्या प्रतीक्षेत




चौकशी पूर्ण होऊन तीन आठवडे उलटले, निधी उपलब्ध नसल्याने अडचणी!

पंढरपूर  (काटूसत्य वृत्त):-  राज्य शासनाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी म्हणून ५ ते ७ रूपये प्रतिलीटर दूध अनुदान जाहीर करण्यात आले. ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२४ मधील प्रतिलीटर ७ रूपये प्रमाणे जाहीर केलेले दूध अनुदान पंढरपूरसह विविध तालुक्यातील दूध उत्पादकांना अद्याप प्राप्त झालेले नाही. काही त्रुटी आढळल्याने १६ मे रोजी आदेश काढून पुन्हा दूध अनुदान फाईल्सांची तपासणी करण्याचा आदेश देण्यात आला.

त्यानुसार आवश्यक पडताळणी करण्यात आल्यानंतरही अद्याप दूध उत्पादकांना अनुदान मिळालेले नाही. राज्य शासनाकडून गायीच्या दूधासाठी जाहीर सप्टेंबर २०२४ मधील ५ रूपये अनुदान काही दिवसापूर्वी दूध  उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२४ मधील ७ रूपये प्रतिलिटर प्रमाणे दूध अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप प्राप्त झालेले नाही. दूध अनुदानासाठी शासनाने निर्माण केलेल्या ऑनलाईन सिस्टीममध्ये आवश्यक ती माहिती संबंधित दूध उत्पादक संस्थांनी भरून दिलेली आहे. असे असतानाही अलिकडेच पुन्हा काही दूध संस्था प्रकल्पांची फेरतपासणी करण्यात

आली. ही तपासणी पूणे होऊनही तीन आठवडे होऊन गेले आहेत. मात्र, अद्याप दूध उत्पादकांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. सुरूवातीला जाहीर केलेली अनुदान रक्कमेअभावी उपलब्ध नव्हती. नंतर शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यासाठी निधीची तरतूद केली. यानंतर तात्काळ अनुदान देण्यात

येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना ७ रूपये प्रतिलीटरप्रमाणे जाहीर केलेले दूध अनुदान अद्याप मिळालेले नाही. पुणे येथील दूग्ध विकास विभाग आयुक्त कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली असता पुढील पंधरा दिवसात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात

येईल असे सांगण्यात आले.


चौकट 

स्वतः सहभागी झालेल्या दूध संस्था वेटींगवर ज्या खासगी प्रकल्पांनी दूध अनुदानात सहभाग घेतला होता, त्यांचे संपूर्ण अनुदान जमा झाले आहे. त्यामध्ये सोनाई, नेचर डिलाईट डेअरी, रिअल डेअरी, डायनामिक आदींचा समावेश आहे. मात्र, वैयक्तिक सहभाग घेतलेल्या दूध संस्थांचे अनुदान मात्र चौकशीच्या नावाखाली गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यांच्यावर अनुदान रक्कम मिळण्यासाठी वाट पाहण्याची वेळ आली आहे. 


पुढील पंधरा दिवसात अनुदान रक्कम जमा होईल

ज्या दूध संस्थांचे अनुदान चौकशीच्या कारणावरून प्रलंबित होते, त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. पुढील पंधरा दिवसात अनुदान रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न असल्याचे दूग्ध विकास विभाग आयुक्त मोहोड यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments