शिंदेसेनेत गटबाजीचे तुफान,सत्तासंघर्ष शीगेला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना शिंदे गटात राजकीय सत्तासंघर्ष शीगेला पोहोचला असून गटबाजीमुळे 'महाभारत'सुरू झाले असून पक्षावर वर्चस्व ठेवण्याच्या महत्वाकांक्षेतून पक्षपदाधिकार्यांमध्ये 'शीतयुध्द'सूरू झाले आहे. शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या निर्णयप्रक्रियेतून डावलले जात असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्रात सावंतांनी बोलून दाखवली आहे. तशाच हालचाली शिवसेनेत घडल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भावाला मंत्रिपदाचा शब्द मिळत असताना आपल्याला डावलले जात आहे, अशी धारणा झाल्यानेच सावंतांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे सावंत यांनी जिल्हा परिषद सदस्य, विरोधी पक्षनेत्यापर्यंत मजल मारली. शिवसेनेतील फुटीनंतर तानाजी सावंत यांच्याप्रमाणेच शिवाजी सावंत यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले.
एकनाथ शिंदे यांनीही शिवाजी सावंत यांच्यावर सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. काही महिन्यांपर्यंत सावंत यांचे काम पक्षात सुरळीतपणे सुरू हेाते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संजय कोकाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर माढा तालुक्यातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि शहराध्यक्षांच्या नियुकत्यांमध्येही सावंत यांना डावलले गेल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. सावंत यांनी सूचविलेल्या नावाऐवजी इतरच नावे पुढे आल्याने त्यांच्या नाराजीचा स्फोट झाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, शिवाजी सावंत यांनी दोन महिन्यांपूर्वी मोठा गाजावजा करून माढ्यात एक कार्यक्रम आयोजित केला हेाता, त्याला एकनाथ शिंदे यांना आमंत्रित केले होते. मात्र, शिंदेंनी अचानकपणे येण्याचे टाळून उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर नेत्यांना कार्यक्रमासाठी पाठवले होते. त्यामुळे शिवाजी सावंत यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज झाले होते. शिंदेंनी कोणाच्या सांगण्यावरून शिवाजी सावंतांच्या कार्यक्रमाला येण्याची टाळले, असा सवाल विचारला जात आहे.
संजय कोकाटे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांचे महत्व वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सावतांच्या समर्थकांकडून केला जात आहे.तसेच, स्वतःच्या माढा तालुक्यातही शिवसेनेचे पदाधिकारी नेमताना आपल्याला विचारले जात नसल्याची भावना शिवाजी सावंतांच्या मनात आहे, त्यातून त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
सावंत कुटुंबात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून कलह असल्याची चर्चा आहे. कुटुंबातील अनेकांनी वेगवेगळ्या राजकीय पक्षात आपला सवतासुभा मांडल्याचे दिसून येत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांची पुण्यात घरी जाऊन भेट घेतली. त्या भेटीत तानाजी सावंतांना शिंदेंनी मंत्रिपदाचा शब्द दिल्याची चर्चा आहे. एकीकडे भावाला मंत्रिपदाचा शब्द मिळत असताना आपल्याला पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतही विचारात घेतले जात नाही, अशी भावना शिवाजी सावंत यांच्या मनात बळावत गेली आणि त्यातून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
शिवाजी सावंत यांचे माजी आमदार बबनराव शिंदे आणि संजयमामा शिंदे यांच्याशी विधानसभा निवडणुकीपासून जवळीक वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत माढ्यात शिवाजी सावंत यांनी बबनदादांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा दिला हेाता. वास्तवीक पाहता अॅड मीनल साठे यांना राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे तिकीट मीळाले होते त्यांचा प्रचार करणे अपेक्षीत असताना सावंतांनी रणजीतसींह शींदेंचा प्रचार केला.यामागे पक्षावर असलेली त्यांची नाराजी दीसून आली.
विधानसभेच्या निवडणुकीत शिवाजी सावंत यांना पक्षाच्या चिन्हावर ४० हजार, तर मला ७० हजार मते मिळाली. तरीही ते म्हणणार की गाडीखाली चालणारं म्हणतंय मीच गाडी ओढतोय, अशी भाषा त्यांनी अनेक ठिकाणी वापरली. पक्षाने मला त्यांच्यावर बोलू नका, असे सांगितले आहे. पण माझं दुकान काय राजकारणावर चालत नाही. मला पक्षातून काढलं तरी चालेल. पण, खरी औकात कोणाची आहे, हे त्यांना सांगणार आहे, असा थेट हल्ला संजय कोकाटे यांनी शिवाजी सावंतांना प्रत्त्युत्तर देताना चढवला आहे.शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या राजीनाम्यानंतरही शिवसेना शिंदे गटात सुरू झालेली धुसपुस कायम असून सोलापूर शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्यासह अकराजणांनी लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करत पक्ष पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षातील कोणालाही विश्वासात न घेता नवनियुक्त्या करणे, जुन्या कार्यकर्त्यांना डावलणे, पक्षात आलेल्यांना कामाची संधी न देणे असे उद्योग केले असून हे पक्ष हिताला मारक आहेत असे कोल्हे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
0 Comments