सोलापूरला पावसाने झोडपले, घरांमध्ये पाणी; काही शाळांभोवती तळी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहर व जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. शहरात पडलेल्या पावसाने ७२.७ मिलिमीटर एवढी नोंद केली. यात बाळे परिसरात जनजीवन विस्कळीत होऊन संतोषनगर व तोडकर वस्ती भागातील ८० घरे पाण्याखाली गेली.
त्याच भागात एका शाळेला आवारात सक्तीची सुटी जाहीर करावी लागली, तर अन्य एका शाळेत जाण्या-येण्यासाठी वाटेत पाणी साचून तळे निर्माण झाले. त्यामुळे तेथे यायला-जायला मुलांना जीव मुठीत धरून जावे लागते. दरम्यान सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे काही झाडे उन्मळून पडली. तर काही घरे कोसळली.
या परिसरात काही घरांमध्ये गटारीचे घाण पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांच्या तक्रारीनुसार, या भागात नालेसफाई न झाल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. संतोषनगरात अनेक कुटुंबांना रात्री घराबाहेर बसून सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा लागला. घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
जवळच्या बार्शी रस्त्यावरही पावसाचे पाणी साचून अनेक रस्ते तळ्यांचे स्वरूप धारण करीत आहेत. वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही ठिकाणी वाहने बंद पडली आहेत. शहरात अन्य सखल भागातही पावसाने पाणी साचले असून, तेथे नागरिकांची त्रेधातिरपीट झाली. विशेषतः शेळगी येथे ८९.८ मिमी इतका मुसळधार पाऊस झाला. त्या खालोखाल सोलापुरात ८२.५ मिमी एवढा पाऊस झाला. तिऱ्हे महसूल मंडल क्षेत्रात ६७ मिमी पाऊस झाला.
दक्षिण सोलापूरमध्ये ३७.६ मिमी, मोहोळमध्ये ३८.४ मिमी पाऊस झाला. सांगोल्यात २९.५, अक्कलकोटमध्ये २५.२, बार्शीत २४.३, पंढरपुरात २०.९, माळशिरसमध्ये २०.५, माढा-१८.४ आणि मंगळवेढा-१६ याप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे अनेक नाले-ओढे व नद्यांना पाणी आले आहे.
दरम्यान सोलापूर शहरात मुसळधार पावसामुळे काही झाडे उन्मळून पडली. तर काही घरे कोसळली. महापालिका उद्यानात पाणी मोठ्या प्रमाणावर शिरूर येथील लहान मुलांची खेळणी पाण्याखाली गेली. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहाबाहेर एक झाड उन्मळून पडल्याने त्यात कोणत्याही प्रकारची वित्त व जीवित हानी झाली नाही. तसेच बुधवार पेठेतील मिलिंद नगर परिसरात एक घर कोसळले.
0 Comments