'एक घर, एक गाडी' मोहीम, लाखो मराठे एकत्र येणार
मराठा आरक्षणासाठी भगवं वादळ पुन्हा मुंबईत धडकणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, ही मागणी करत मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होणार आहेत. २७ ऑगस्टला अंतरवलीहुन मुंबईकडे रवाना होणार आहेत. राज्यातील मराठा समाजाला जरांगे यांनी मोठे आवाहन केले आहे. 'एक घर, एक गाडी' या संकल्पनेतून येण्याचे त्यांनी आवाहन केले. सोबत पाण्याच्या टँकर देखील घेऊन निघा. आरक्षणाचा विजय मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, असे आवाहन जरांगेनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील हे बुधवारी सकाळी सोलापुरात आले होते. शासकीय विश्रामगृह येथे मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांशी संवाद साधून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठी आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यावेळी जरांगे म्हणाले, 'मराठ्यांना कोणी काठीनेही डिवचायचं नाही.'
जरांगे पाटील म्हणाले, मुंबईकडे मोर्चा जाताना मराठा समाजाच्या पोरांना कोणी काठीने देखील डिवचायचं नाही. पोलिसांच्या बळावर मराठा समाज बांधवावर अन्याय अत्याचार करणे बंद करा. आम्ही शांततेत येणार आहे, याअगोदर आम्ही शांततेत आलो आणि गेलो होतो. मराठ्यांनी वादग्रस्त काहीही करायचं नाही, जाळपोळ दगडफेक अशा कृती करायच्या नाहीत. कुणी केलं तर त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या, असेही जरांगेनी स्पष्ट सांगितले.
जरांगे पुढे म्हणाले, कोणीही अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करेन, तो सरकारचा व्यक्ती असेल, असं समजू. राज्य सरकारने नाटकं करू नये. आंतरवली सराटी येथे जशी मारहाण केली, तशी मारहाण करायची नाही. तुमचं तर कार्यक्रमच होणार आहे. तुमच्यामुळे मोदी सरकारचा देखील बट्ट्याबोळ होणार आहे, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
चूक झाली की किंमत मोजावी लागेल
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनात जर काही चूक झाली तर त्याची किंमत मोदींना सुद्धा मोजावी लागेल. एकदा आमची डोके फुटले आहेत आता आई बहिणीला जर धक्का लागला तर आता माफी नाही, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारला दिला. 29 ऑगस्टच्या अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला सज्जड दम भरला आहे.
आमच्याच विटांनी फोडली आमचीच डोकी
अंतरवाली सराटीचा तो विषय निघाला तर माझं काळीज चरल्यासारखं होतंय, आमच्याच घराच्या विटांनी आमच्याच लोकांची डोकी फोडल्याची आठवण त्यांनी काढली. ज्यावेळी बंदुकीतील गोळ्या संपल्या त्यावेळेस उलट्या बंदुका करून आम्हाला मारलं, असे ते म्हणाले. आम्हाला जर आता अडवलं तर महाराष्ट्रातील पानंद रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही, ती भानगड आता करू नका. कारण तुम्हाला ती सवय आहे तुम्हाला जनतेची माया नाही. तुम्हाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरू बाळ करत नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
तर आता चुकीला माफी नाही
आई-बहीण आणि पोरांवर हात पडला तर मराठे कुठल्याही थराला जातील एवढे लक्षात ठेवा. अन मराठे बार बार मार खायला मोकळे नाहीत हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. आता चुकीला माफी नाही. आता मराठे सरकारचा मार निमुटपणे खाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.मोर्चाच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत आहे.
0 Comments