सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप माने यांची निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांची निवड करण्यात आली आहे.
तर उपसभापती पदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड झाली आहे. सभापती आणि उपसभापती दोन्ही पदासाठी एक-एक अर्ज आल्याने दोन्ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे.
दोन वर्षांसाठी दिलीप माने यांच्याकडे राहणार सभापतीपद
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध आमदार सुभाष देशमुख यांच्या पॅनलमध्ये थेट लढाई झाली होती. या लढतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी गटाचा एकतर्फी विजय झाला होता. त्यानंतर बाजार समितीच्या सभापतीपदी कोणाची निवड होणार याचीच चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु होती. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत माजी आमदार दिलीप माने सभापती पदी आणि भाजप नेते सुनील कळके यांची उपसभापती पदी निवड जाहीर करण्यात आली. सभापती आणि उपसभापतींची निवड होताच भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी दिलीप माने आणि सुनील कळके समर्थकांनी मोठा जल्लोष केलाय.
दिलीप मानेंकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह कल्याणशेट्टींचे आभार
सभापती निवड झाल्यानंतर दिलीप माने म्हणाले, सचिन कल्याणशेट्टी यांनी हे पॅनेल उभा करुन निवडून आणलं. माझी निवड करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेतलं. सभापतीपदाचा मान मला सचिनदादांनी दिला. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. निश्चितपणे मी शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी मी चांगल काम करेन. ह निवडणुकीच्या नियोजनचा भाग आहे, मिलीभगत नाही. मला दोन वर्षे आणि हसापुरे साहेबांना पुढचे दोन वर्षे असं ठरलेलं आहे. सचिनदादांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचं नियोजन ठरलेलं आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला होता. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या श्री. सिद्धेश्वर विकास पॅनलने 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजप आमदार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा एकदा पराभवाचा झटका बसलेला पाहायला मिळाला होता. 18 पैकी केवळ 3 जागांवर सुभाष देशमुख यांच्या श्री. सिद्धेश्वर परिवर्तन पॅनलचा विजय झाला होता. निर्णायक असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी गटातील 11 पैकी 11 जागांवर कल्याणशेट्टी पॅनलचे एकहाती वर्चस्व मिळालं होतं. तर ग्रामपंचायतीतील 4 पैकी 3 जागांवर सुभाष देशमुखांच्या पॅनलने वर्चस्व सिद्ध केले होते.
0 Comments