आई-वडिलांचे प्रोत्साहन, रोज दहा तास अभ्यासाचे यश
वैष्णवी गायकवाड, परीस गायकवाडने मिळवले यश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच माझ्या वडिलांनी मला क्लास वन अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. प्रोत्साहनाला बळ देण्यासाठी सोबत आई होतीच. दोघांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोज सलग दहा दहा तास अभ्यास केला. यामुळेच राज्य लोकसेवा आयोगाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळाले, अशी प्रांजळ प्रतिक्रिया वैष्णवी गायकवाड हिने व्यक्त केली.
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात वैष्णवी ही राज्यात पाचवी तसेच मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे. एमपीएससीच्या वेबसाइटवर निकाल पाहताच वैष्णवीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. शिक्षक असलेल्या आपल्या आई-वडिलांच्या पाया पडत दोघांचेही तिने आभार मानले. वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नुमती प्राथमिक विद्यालयात झाले. दमाणी प्रशालेत तिचे माध्यमिक तसेच ऑर्किड महाविद्यालयात तिने स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अधिक माहिती देताना तिचे वडील राम
गायकवाड यांनी सांगितले, माझी मुलगी अधिकारी व्हावी, ही माझी इच्छा होती. प्रशासनात राहून सेवा करणे म्हणजे देशसेवाच ना. तिच्या मेहनतीने तिला लोकसेवा करण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, नोकरी सांभाळत अभ्यास करणे खूप अवघड होते. परंतु मला क्लास वन अधिकारी व्हायचे होते. त्यादृष्टीने तयारी केली. अभ्यासाचा आराखडा बनवला. यात आई वडिलांची मदत मिळाली, असे राज्यातून दुसरा आलेला परीस गायकवाड याने लोकमतला सांगितले. परीस हा सध्या सोलापूरच्या राष्ट्रीय महामार्ग विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे.
0 Comments