'ना आमदार, ना खासदार...शेतकऱ्यांच्या मदतीला धावला वरूणराज!'; शेतीचे नुकसान, फळबागा संकटात..
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी तडफडावे लागले असतानाच वरूणराजाने दिलासा दिला. राजकारण्यांकडून टेंभू योजनेचे पाणी मान नदीत सोडले जाईल, निरा उजव्या कालव्यातून हक्काचे पाणी मिळेल, असे आश्वासने वारंवार देण्यात आली.
मात्र प्रत्यक्षात पाणी मिळालेच नाही. तालुक्यातील महत्त्वाची ८१ गावांच्या शिरभावी योजनाही बंद असल्याने पिण्यासाठीही नागरिकांची हाल होत आहेत. पाण्याअभावी शेती पिके धोक्यात आली आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परंतु मंगळवारी (ता. १३) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. त्यामुळे "ना आमदार, ना खासदार...शेतकऱ्यांच्या मदतीला धावला वरूणराज!" अशी भावना गावांगावात उमटू लागली आहे.
सांगोला तालुका हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. उन्हाळ्यात तालुक्यामध्ये नेहमीच दुष्काळाची मोठी परिस्थिती निर्माण नेहमी होत असते. यावर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्यावेळी उन्हाळ्यात टेंभूचे पाणी मान नदीत सोडल्यामुळे नदीकाठच्या भागांना दिलासा मिळाला होता. परंतु यावेळी तालुक्यात टेंभूचे पाणी मान नदीत सोडून बंधारे भरण्यासाठी राजकारणी मंडळींनी प्रयत्न केले, मंत्र्याला भेटून तारकांची आश्वासनही मिळाले. त्याबाबत त्यांनी सोशल मीडियावर तालुकाभर प्रसिद्धीही केली. परंतु टेंभूच्या पाण्याने ऐन उन्हाळ्यात मान नदीतील बंधारे काही भरले नाहीत. तसेच तालुक्याला हक्काचे पाणी मिळणारे निरा उजवा कालव्याचेही पाणी अनेक भागाला मिळाले नाही. 'टेल टू हेड' अशी पाणी मिळण्याची व्यवस्था असताना नेहमी निरा उजवा कालव्याच्या पाण्यावर सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. यावेळी हक्काचे पाणी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजकारण्यांकडून केवळ तारखा आणि आश्वासने
उन्हाळ्यात टेंभूचे पाणी मान नदीत सोडण्याची अनेकदा तारखा देण्यात आल्या. मंत्र्यांपासून स्थानिक आमदारांपर्यंत सर्वांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून आश्वासने दिली, मात्र त्याचे प्रत्यक्षात रूपांतर झाले नाही. बंधारे कोरडेच राहिले आणि निरा उजव्या कालव्याचे पाणीही बहुतेक भागांपर्यंत पोहोचले नाही. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलनही केली, शेतकऱ्यांना पाणी मात्र मिळाले नाही. निरा उजवा हक्काच्या पाण्यापासून तालुक्यातील शेतकरी वंचित राहिला. याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र भावना असल्या तरी राजकारण्यांनी मात्र याबाबत कोणतीही ठोस भूमिका मात्र घेतली नाही. नेतीमंडळी राजकारणाच्या बेरीज-वजाबाकीत अडकली तर शेतकरी मात्र पाण्याअभावी बेजार झाला अशी अवस्था झाली होती.
शेतीचे नुकसान, फळबागा संकटात
तालुक्यातील डाळिंबावरील रोगांमुळे डाळिंबाचे मोठे क्षेत्र घटले आहे. डाळिंब बागा मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याने शेतकरी सध्या ऊस, केळी, ड्रॅगन फ्रुट, चिकू, आंबा यासह अनेक फळपिके शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतली होती. मात्र पाण्याच्या अभावामुळे ही पिके धोक्यात आली. उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाईमुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या हक्काचे पाणीही शेती पिकांना न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक
पाण्याबाबत राजकीय मंडळींनी दिलेली आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उन्हाळ्यात पाणी न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड संताप आहे. पावसाच्या आगमनानंतर सोशल मीडियावर "देव तारी त्याला कोण मारी", "पावसानेच पुढाऱ्यांना चपराक दिली", "आता मतांचेही फक्त आश्वासनच मिळणार", "तारीख पे तारीख..लेकिन पाणी नही मिला", "राजकारणी असंवेदनशील, शेतकऱ्यांचा आधारवड निसर्गच" अशा टीकात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात उमटल्या आहेत.
वरुणराजाचीच शेतकऱ्यांवर झाली कृपा -
मंगळवारी रात्री शहर व तालुक्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पाण्याला आलेली पिकांना जीवदान मिळाले आहे. राजकारण्यांनी तालुक्यातील पाण्याची व्यवस्था केली नसली तरी शेतकऱ्यांसाठी वरूणराजाच मदतीला धावला अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
0 Comments