महापालिकेत मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणण्यासाठी मोठ्या ताकदीने प्रयत्न करा – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारींची महत्त्वपूर्ण बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीत राज्याचे कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर संपर्क मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी उपस्थित पदाधिकारींना मार्गदर्शन केले.
भरणे मामा म्हणाले की, “सोलापूर शहरातील सर्व 26 प्रभागांतील 102 उमेदवार उभे करण्याची तयारी करा. प्रभागात, वॉर्डात जा, लोकांपर्यंत पोहोचा, त्यांची कामे करा आणि संवाद साधा. आपण महायुतीचा भाग असलो तरी स्वबळावरची तयारी ठेवा. महापालिकेच्या निवडणुकीत लढण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, आणि त्या निर्णयाचे पालन करण्यात येईल.”
बैठकीत माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी सांगितले की, “आम्ही रडणारे कार्यकर्ते नाही, लढणारे आहोत. निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.”
प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे म्हणाले की, “लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने सोलापूर शहरातील महायुतीच्या सर्व उमेदवारांचे मनापासून काम केले आहे. त्यामुळे महापालिकेत आम्ही स्वबळावर किंवा महायुतीतून लढण्यास तयार आहोत. जिल्हाध्यक्ष संतोष पवार हे सर्वांना सोबत घेऊन चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत.”
कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले की, “राष्ट्रवादीच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन लवकरच प्रभाग यात्रा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी झाली आहे.”
तर प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी स्पष्ट केले की, “महायुती झाली तरी लढू आणि न झाली तरीही आम्ही मोठ्या ताकदीने लढण्याची तयारी ठेवली आहे.”
बैठकीत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष राज्यभर शिव–फुले–शाहू–आंबेडकर या विचारधारेवर काम करीत आहे. भरणे मामा आपण कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सोलापूरकरांची सेवा केली, त्यामुळे सोलापूरकरांशी आपले अतूट नाते निर्माण झाले आहे. याचा निश्चितच राष्ट्रवादीला फायदा होईल.”
पुढे ते म्हणाले, “सोलापूर शहरातील सर्व ज्येष्ठ नेते, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांना सोबत घेऊन प्रभाग यात्रा आणि ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ उपक्रम राबविण्यात येईल. सर्व 26 प्रभागांतील उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू असून त्याचा अहवाल कृषीमंत्री भरणे यांच्याकडे सादर करण्यात येईल.”
या बैठकीस शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक तौफिक शेख, राष्ट्रीय सेवादल उपाध्यक्ष चंद्रकांत दायमा, अल्पसंख्यांक आयोग सदस्य वसीम बुऱ्हाण, जेष्ठ नेते मकबूल मोहोळकर, माजी सभापती आनंद मुस्तारे, राष्ट्रीय सचिव फारूक मटके, माजी नगरसेवक सलिम पामा, नूतन गायकवाड, वाहिदबी शेख, तस्लिम शेख, प्रदेश सचिव इरफान शेख, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, युवती अध्यक्ष किरण माशाळकर यांच्यासह शहरातील विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून आले.
0 Comments