Hot Posts

6/recent/ticker-posts

बहुसदस्य पद्धतीने होणार पालिका निवडणुका

बहुसदस्य पद्धतीने होणार पालिका निवडणुका

 मुंबई (कटूसत्य वृत्त):-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोग या निवडणुका घेण्यासाठी सक्रिय झाला आहे. निवडणुका घेण्यासाठी महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे आदेश आयोगाने राज्य सरकारला बुधवारी दिले. तसेच, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समित्यांच्या गणांची रचना करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला पालिकांची प्रभाग रचना, तसेच गट आणि गणांची फेररचना करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे.

बहुसदस्य पद्धतीने होणार पालिका निवडणुका

महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका या बहुसदस्य पद्धतीने होण्याची शक्यता अधिक आहे. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. महायुती सरकारने मुंबई वगळता पालिका निवडणुका या बहुसदस्य पद्धतीने घेण्याचे धोरण राबविले आहे.  ग्रामपंचायतीमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णयही महायुतीने यापूर्वी घेतला आहे.  येणाऱ्या पालिका, नगर परिषदा निवडणुका या महायुती सरकार बहुसदस्य पद्धतीनेच घेणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments